गोंदिया : दोन वर्षापूर्वी आंतरजिल्हा बदली झालेल्या गोंदिया जिल्ह्यातील १९ शिक्षकांची बदली औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रद्द झाल्याने या शिक्षकांना पुन्हा जिल्ह्यात परतावे लागणार आहे.आधीच अनेक शिक्षक अतिरिक्त बसताना या शिक्षकांचा बोझा जिल्हा परिषदेवर पडणार असून या शिक्षकांचे समायोजन कसे करायचे असा प्रश्न प्रशासनापुढे आहे.एकीकडे जिल्हा परिषद शाळेतील पटसंख्या सातत्याने घटत असल्यामुळे शिक्षकांची संख्या अतिरिक्त होत आहे. त्यामुळे शासनापुढे या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न भविष्यात निर्माण झाल्यास आश्चर्य वाटू नये. आजघडीला गोंदिया जिल्ह्यात तब्बल ३५ शिक्षक अतिरिक्त आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येची टक्केवारी सातत्याने घटत आहे. एकीकडे शिक्षणाच्या कायद्यामुळे विद्यार्थी संख्येनुसार शिक्षकांची नेमणूक करणे गरजेचे आहे. अशावेळी अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन कुठे होणार असा प्रश्न पुढे येत आहे. यावर तोडगा म्हणून दोन वर्षापुर्वी जिल्ह्यातील अनेक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली करण्यात आली. यातील १९ शिक्षकांची बीड येथे नियुक्ती करण्यात आली होती. परंतु या जिल्ह्यात ८१३ शिक्षक अतिरिक्त ठरल्याने औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीत आलेल्या शिक्षकांना परत त्यांच्याच जिल्ह्यात पाठविण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे १९ शिक्षकांना पुन्हा गोंदिया जिल्ह्यात यावे लागणार आहे. जिल्ह्यात शिक्षक अतिरिक्त असताना समाजयोजनाचा प्रश्न प्रशासनापुढे राहणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
१९ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली रद्द
By admin | Updated: July 23, 2015 01:53 IST