ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ३ - विधानसभा निवडणूक अकरा महिन्यांवर असल्याने नवनवी राजकीय समीकरणे राज्यात आकार घेऊ लागली आहेत. युगोडेपाचे नेते अँड. राधाराव ग्रासियस आणि सांताक्रुझचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यात शनिवारी बैठक झाली. युगोडेपाने पुन्हा आपल्याला चिन्ह मिळावे म्हणून निवडणूक आयोगाकडे अर्ज केला असल्याची माहिती या बैठकीतील चर्चेमधून उघड झाली.
युगोडेपा हा एकेकाळी बळकट प्रादेशिक पक्ष होता. आता हा पक्ष पूर्ण अस्तित्वहीन झाला आहे. विधानसभेत युगोडेपाचे अस्तित्वही नाही. शिवाय दोन पाने ही निशाणीही युगोडेपाने गमावली आहे. आता युगोडेपाला पुन्हा नवी कार्यकारिणी नेमावी लागेल. त्यासाठी अगोदर आमसभा बोलवावी लागेल व आमसभा बोलविण्यापूर्वी सहा आठवडे अगोदर नोटीस द्यावी लागेल. आपल्यात व राधाराव यांच्यात अशा प्रकारची चर्चा झाल्याचे मोन्सेरात यांनी बैठकीनंतर सांगितले. आपण युगोडेपासोबत जाईन हे पूर्वीच स्पष्ट केले आहे. युगोडेपाने गोवा फॉरवर्ड किंवा अन्य पक्षांशी युती करावी की नाही, याचा निर्णय प्रत्यक्ष निवडणुकांवेळीच घ्यावा लागेल. सध्या राजकीय समीकरणांबाबत अंदाज बांधता येणार नाही. कोण कुठल्या बाजूने जाईल हे आताच सांगता येणार नाही, असे मोन्सेरात म्हणाले.
दरम्यान, गोवा विकास पक्षाचे प्रमुख असलेले आमदार मिकी पाशेको हेही सक्रिय झाले आहेत. त्यांनी सत्ताधारी भाजपपासून फारकत घेण्याची स्वत:ची तयारी असल्याचे संकेत देणे सुरू केले आहे. कॅसिनोप्रश्नी पाशेको यांनी भाजपवर टीकाही केली आहे. पर्वरीचे आमदार रोहन खंवटे व डिचोलीचे आमदार नरेश सावळ यांनी गोवा फॉरवर्ड पक्षासोबतच राहण्याचा विचार केला असल्याची माहिती मिळते. सावळ यांनी तर आपल्याला काँग्रेस पक्षाने तिकीट देऊ केले तरी ते नको, अशी भूमिका यापूर्वी घेतली आहे. म.गो. पक्षाचे तिकीट सावळ यांना मिळाले तर ते स्वीकारतील.
खंवटे यांनी मात्र आपण गोवा फॉरवर्डसोबत राहावे असेच तत्त्वत: ठरवले आहे. भाजपविरोधात सर्व विरोधक एकत्र येऊ शकतात काय असे पत्रकारांनी शनिवारी खंवटे यांना विचारले असता, आम्ही तीन आमदार सध्या संघटित आहोत. काँग्रेस किंवा अन्य कोणत्या पक्षाचे आमदार आमच्यासोबत येत असतील तर आम्ही स्वागतच करू, असे खंवटे म्हणाले. आमची सहा आमदारांची यापूर्वीची महायुती ही विधानसभा अधिवेशनापुरतीच होती, असेही ते म्हणाले.