फोंडा : माशेल येथील खांडोळा-आमोणा जंक्शनजवळ असलेल्या हॉटेलला स्कूटरने धडक दिल्याने एका युवकाला प्राण गमवावे लागले, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्कूटरवरून (क्र. जीए 0७ एम ९६११) कार्तिक सपुरा शेट, चेतन रमेश तारी आणि शंकर गजानन देसुलकर हे युवक बसस्थानकाजवळील बगलरस्त्यावरून कुंभारजुवेच्या दिशेने जात होते. खांडोळा-आमोणा जंक्शनवर स्कूटर चालविणाऱ्या युवकाचा ताबा गेल्याने ती समोर असलेल्या हॉटेलला धडकली. यात तिघेही गंभीर जखमी झाले.जखमींना बेतकी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत असताना कार्तिक सपुरा शेट (वय ३२, रा. गोळवाडा-कुंभारजुवे) याचे निधन झाले. चेतन रमेश तारी (वय ३४) आणि शंकर गजानन देसुलकर (वय २२, दोघेही राहणारे गोळवाडा-कुंभारजुवे) यांना गंभीर जखमी अवस्थेत अधिक उपचारार्थ बांबोळीच्या गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. चेतन याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांंगितले.दरम्यान, कार्तिक याचा मृतदेह बांबोळी शवागारात ठेवण्यात आला असून रविवारी चिकित्सेनंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येईल, असे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. साहाय्यक उपनिरीक्षक चंद्रकांत गावस पुढील तपास करत आहेत.(प्रतिनिधी)