साखळी : भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. त्याचप्रमाणे गोवा राज्यातही कृषी संस्कृती अविरत नांदत आली आहे. परंतु काही कारणास्तव आज कृषी संस्कृती लोप पावण्याची भीती आहे. हा व्यवसाय जोमाने पुढे नेऊन कृषी संस्कृती टिकवण्यासाठी ज्येष्ठांबरोबरच तरुणाईनेही पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन गोवा राज्याचे हंगामी सभापती तथा मये मतदारसंघाचे आमदार अनंत शेट यांनी साखळी येथे केले. कृषी संचालनालय, गोवा आणि विभागीय कृषी कार्यालय, साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने साखळी रवींद्र भवनात कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे या नात्याने उपसभापती अनंत शेट उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर साखळी मतदारसंघाचे आमदार तथा साखळी रवींद्र भवनचे अध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित होते. खास निमंत्रित म्हणून पाळी मतदारसंघाचे माजी आमदार सदानंद मळीक, गोवा राज्य कृषी संचालनालयाचे संचालक उल्हास पै काकोडे, साखळी कृषी खात्याचे कृषी अधिकारी किशोर भावे, गोवा फलोत्पादन महामंडळाचे संचालक सुभाष मळीक, संतोष मळीक, विश्वंभर गावस, शांबा गावकर, भोला खोडगीणकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनंत शेट म्हणाले की, एकेकाळी आपल्या पूर्वजांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी शेतीत आपले सर्वस्व पणाला लावले. कित्येक वर्षे गोव्यातील शेती कसण्याबरोबरच कृषी संस्कृतीलाही चालना मिळाली. परंतु आज नोकरीच्या मोहात अडकलेला तरुण शेती व्यवसायाला दुय्यम मानू लागला आहे. त्याचप्रमाणे शेतकामगारांच्या कमतरतेमुळे आणि महागाईमुळे शेती व्यवसायाला खीळ बसू लागली आहे. हे चित्र बदलायला हवे, असे शेट म्हणाले. डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, भाजपाचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यावर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक शेतीप्रधान कामांना चालना मिळाली. शेतातील गाळ उपसण्याबरोबरच विविध योजना आखून शेती व्यवसायातील अडथळे दूर केले आहे. आवश्यक त्या ठिकाणी बंधारे बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध केला. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना साधनसुविधा पुरविल्या. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने शेतीत कष्ट करण्याची तयारी ठेवून एक पाऊल पुढे टाकणे गरजेचे आहे. यावेळी माजी मंत्री सदानंद मळीक म्हणाले, खाणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना कृषी खात्याने अधिक सवलती द्यावात. खाणग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती देऊन शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणाव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. कृषी अधिकारी किशोर भावे यांनी सर्वांचे स्वागत केले. कृषी खात्याचे संचालक उल्हास पै काकोडे यांनी प्रास्ताविक करून सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून कृषी मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कृषी कार्डसाठी अर्ज केलेल्यांना उपसभापती अनंत शेट यांच्या हस्ते कृषी कार्ड देण्यात आले. किशोर भावे यांनी आभार व्यक्त केले, तर डॉ. गोविंद परब यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
तरुणांनो, शेतीमध्ये उतरा
By admin | Updated: January 3, 2016 01:45 IST