लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत विधवांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्यात आली असून, आता दरमहा ४ हजार रुपये मिळतील. पात्रतेसाठी उत्पन्न मर्यादाही वाढवून दीड लाख रुपये केली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
सुधारित योजनेनुसार सर्वांत लहान मुलगा अथवा मुलगी २१ वर्षांखालील आहे, अशी विधवा महिला या योजनेस पात्र आहे. ६० वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या तसेच २१ वर्षांपेक्षा जास्त वयाचे अपत्य असलेल्या विधवेला महिना २,५०० रुपये मिळतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या वार्षिक २४ हजार रुपये उत्पन्न मर्यादा आवश्यक आहे, ती वाढवून आता दीड लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे लाभापासून वंचित असलेल्या विधवांनाही या योजनेचा फायदा मिळेल.
समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात एक घोषणा केली होती ती अशी की, गृहआधारचा लाभ घेणाऱ्या गृहिणींचा कुंकवाचा आधार गेल्यास त्यांना गृह आधारचे १५०० व विधवांना समाजकल्याण खात्याच्या योजनेतून मिळणारे २५०० मिळून ४ हजार रुपये दिले जातील. त्यासाठी एकच योजना असेल. दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेत आवश्यक ती दुरुस्ती करून ही तरतूद सरकारने आता केलेली आहे, त्यामुळे विधवांना तो फार मोठा दिलासा ठरणार आहे.
महिना आठ कोटी रुपये अतिरिक्त भार पडणार...
समाजकल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ३९,०६६ पैकी साधारणपणे ५० टक्के विधवांना ४ हजार रुपये अर्थ साहाय्याचा लाभ मिळू शकेल. त्यामुळे दरमहा साडेसात ते आठ कोटी रुपये अतिरिक्त बोजा पडेल. विधवा महिला जर ६० वर्षापेक्षा अधिक वयाची असेल व तिचे अपत्य २१ वर्षे वयापेक्षा अधिक वयाचे असेल तर महिना २,५०० रुपयेच मिळतील. अशा साधारणपणे ५० टक्के विधवा असू शकतात. सरकारने विधवांना आधार म्हणून ही सुधारित योजना आणली आहे. आता नवीन अर्ज समाजकल्याण खात्याकडेच करावे लागतील.