पणजी/मुंबई : भारतातील आधुनिक वास्तुकलेचा चेहरा अशी ओळख असलेले जगविख्यात वास्तुरचनाकार व पद्मविभूषण तसेच ‘गोमन्त विभूषण’ पुरस्काराने सन्मानित चार्ल्स कुरैय्या यांचे मुंबईत मंगळवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय ८४ होते. कुरैय्या यांचा गोव्याशी कायम संबंध राहिल्याने त्यांच्या निधनाविषयी गोव्याच्या सर्व थरांतील लोकांमध्ये दु:ख व्यक्त झाले. कुरैय्या यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांना दिली.पणजीतील मांडवी नदीच्या किनारी वसलेल्या वेरे-बार्देस येथे कुरैय्या यांचे घर आहे. कुरैय्या यांचा जन्म १ सप्टेंबर १९३० रोजी सिकंदराबाद येथे झाला. त्यांची पत्नी मोनिका या मूळच्या गोव्याशेजारील मंगळुरू येथील आहेत. मात्र, त्यांचा जन्म मुंबईत झाला. वडिलांच्या निधनानंतर कुरैय्या यांचे कुटुंब मुंबईस राहायला आले. प्रारंभी ते मुंबईतील सेंट झेवियर महाविद्यालयात शिकले. भारतात व विदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये कुरैय्या यांनी विद्यादानाचे काम केले. त्यांना जगातील विविध संस्थांकडून प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले.कुरैय्या यांचे गोव्यात अनेकदा येणे-जाणे असायचे. त्यांना काही वर्षांपूर्वी गोवा कला अकादमीतर्फे ‘गोमन्त विभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
‘विश्वकर्मा’ चार्ल्स कुरैय्या कालवश
By admin | Updated: June 18, 2015 08:54 IST