पणजी : गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सतीश शेटये यांचा कार्यकाळ या महिन्यात संपुष्टात येत असून, निर्धारित प्रक्रियेनुसार कुलगुरूपदाच्या शोधसमितीसाठीची नावे विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाने कुलपतींना पाठवली आहेत. कुलगुरूपदाच्या उमेदवरासाठी ६५ वर्षे वयाची मर्यादा असलेली वैद्यानिक दुरुस्ती करण्यासाठीसुध्दा गोवा विद्यापीठाने पाऊल उचलले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने मागच्या वर्षी विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी वयाची मर्यादा असू नये, असे निर्देश जारी केले होते. देशातील विद्यापीठात सर्वात जास्त कुशल असलेला माणूस विद्यापीठाचा प्रमुख असला पाहिजे, हे या मागचे उद्दिष्ट होते; पण गोवा विद्यापीठाच्या परिनियमात ६५ वर्षांची मर्यादा असल्याने युजीसीच्या आदेशांचे पालन करू शकत नसल्याने या परिनियमात बदल आवश्यक आहेत. यासाठी कुलगुरूंच्या नियुक्तीसाठीच्या गोवा विद्यापीठ परिनियम एसए-६(१) यात दुरुस्ती करावी, असे विद्यापीठाच्या वतीने सरकारला पत्रातून कळविले आहे. युजीसीच्या आवश्यकतेनुसार राज्य सरकारने या परिनियमात बदल करण्यासाठीची परवानगी दिली आहे. ही दुरुस्ती झाली की इतर विद्यापीठांप्रमाणेत गोवा विद्यापीठात कुशल असा कुलगुरू नियुक्त करण्यासाठीची दारे उघडी होतील. सध्याचे गोवा विद्यापीठाचे कुलगुरू सतीश शेटये यांचे वय ६५ वर्षे होत असल्याने त्यांचा कार्यकाळ आॅक्टोबरामध्ये पूर्ण होत आहे. देशतील इतर विद्यापीठांत कुलगुरू वयाच्या ७० वर्षांपर्यंत कुलगुरूपदावर राहिले आहेत. (प्रतिनिधी)
कुलगुरू शेटये यांची मुदत आता संपणार
By admin | Updated: October 17, 2015 02:12 IST