वास्को : वास्को पोलीस ठाण्याचे निरीक्षक नोलास्को रापोझ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या धडक कारवाईत शुक्रवारी रात्री दोघा अट्टल चोरट्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १२ लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. यातील एका चोरट्याकडून २ लाख २१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तर दुसऱ्याकडून सुमारे १० लाखांचा माल हस्तगत केला़ याबाबत वास्को पोलीस ठाण्याचे निरीक्षक नोलास्को रापोझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आल्त दाबोळी येथील हन्ना महम्मद अन्सारी या महिलेने २ डिसेंबर २०१६ रोजी अज्ञात इसमाने घराच्या मुख्य दरवाजाचे टाळे फ ोडून घरातील सोन्याचे दागिने लंपास केल्याची तक्रार नोंदविली होती़ त्यामध्ये २ अंगठ्या, २ ब्रेसलेट, ७ जोड्या कर्णफु ले, ३ सोनसाखळ्या, २ नेकलेस, १ डीएसएलआर कॅमेरा आणि १ मंगळसूत्र मिळून २ लाख २१ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरांविरुध्द भा़दं़सं.च्या ४५७ व ३८० कलमांखाली गुन्हा नोंदविला होता़ पोलिसांनी गेल्या आठवड्यात बोगमाळो येथील रंघवी इस्टेटमधील दरोडाप्रकरणी मुख्य सूत्रधार सिकंदर शेख ऊर्फ चिक्कू याला अटक केल्यानंतर पोलिसांना हा चोरीचा माल हस्तगत करण्यात यश आले. यापूर्वी पोलिसांनी या दरोडा प्रकरणातील अश्पाक आणि मारुती वडार या दोघा संशयितांना अटक केली होती़ या चोरी प्रकरणातील एकूण ऐवजापैकी रोख रक्कम आणि १ लाख ३० हजार रुपये किमतीचा ऐवज तसेच चोरी प्रकरणात वापरण्यात आलेली जीए - ०६/क्यू ८३५३ ही एव्हिएटर दुचाकी ताब्यात घेतली़ दुसऱ्या अन्य एका कारवाईत वास्को पोलिसांनी गुरुवारी रात्री अस्लम कलागर या चोरट्याच्या फकिरगल्ली-शांतीनगर येथील घरावर छापा टाकून २५० ग्रॅम सोन्याचे दागिने, सुमारे १़१ किलो वजनाची चांदीची बिस्किटे व दागिने, १८ मोबाईल, ५ पॉवर बँक, पाच मनगटी घड्याळे, २ कॅमेरे, १ सोनी हॅण्डीकॅम, २ लॅपटॉप, १ डिव्हीडी प्लेअर मिळून सुमारे १० लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केला़ या चोरट्यास पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याने अनेक गुन्ह्यांत आपला हात असल्याची कबुली दिली. या प्रकरणी वास्को पोलीस अधीक्षक लॉरेन्स डिसोझा व दक्षिण गोवा अधीक्षक चंदन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नोलास्को रापोझ पुढील तपास करत आहेत़ नोलास्को रापोझ यांनी वास्को पोलीस ठाण्याच्या निरीक्षक पदाचा ताबा घेतल्यानंतर अनेक गुन्ह्यांचा तपास लागल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)
वास्कोत १२ लाखांचा ऐवज जप्त
By admin | Updated: April 16, 2017 02:41 IST