लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : राज्यात बेरोजगारीचा दर ८.७ टक्के वाढल्याचा दावा गोवा फॉरवर्डचे प्रमुख तथा आमदार विजय सरदेसाई यांनी केला. फातोर्डा येथे आयोजित जॉब फेअरमध्ये त्यांनी बेरोजगारीवरून सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी, गुणवत्तेवर आधारित नोकऱ्यांसाठी लढण्याची आणि नोकरीतील घोटाळे उघडकीस आणण्याची शपथ घेतली.
बेरोजगारीचा प्रश्न सोडवायचा असेल तर युवकांनी हे भाजप सरकार समूळ उखडून टाकले पाहिजे, असे सरदेसाई म्हणाले. व्यासपीठावर नगरसेवक लिंडन परेरा, रवींद्र (राजू) नाईक, पूजा नाईक तसेच इतर नगरसेवक व वुई फॉर फातोर्डाचे कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात शिक्षणाबाबतीत मुली खूप पुढे असल्याचे निकालाच्या वेळी दिसून येते परंतु नोकऱ्यांच्या वेळी त्यातील २१.२ टक्के मुली नोकऱ्या करतात ५६ टक्के पुरुष नोकऱ्या करतात ८० टक्के मुली लग्न झाल्यानंतर घरी बसतात. राज्यात नोकऱ्या मिळणे खूप कठीण झाले आहे. कोणतेही मोठे उद्योग यायला तयार नाहीत.
अनेक विद्यार्थी बंगळूर, पुणे येथे जातात. गोव्यात सात आयटी कॉलेज आहेत. परंतू आयटी पार्क नाही, अनेक फार्मा कंपन्या आहेत परंतु एकच फार्मा कॉलेज आहे. सरकार अपयशी झाल्यावर बेरोजगारांना २ हजार रुपये योजना आणणार आहे. सरकार केवळ नोकऱ्या घोटाळ्यात व ते लपवण्यावर गंभीर आहे. लोकांचे लक्ष वळविण्यासाठी पूर्वीची केस काढली जात असल्याची टीका सरदेसाई यांनी केली.