लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मगो पक्षाने कोंकणी व मराठी या दोन्ही भाषांमध्ये कधीच भेदभाव केला नाही. उदय भेंब्रे हे आता टीका करत आहेत. मात्र, आमदार होताना त्यांना मगोपची भूमिका माहिती नव्हती का? खरे तर त्यांना बहुजन समाजाचे वावडे आहे. हा समाज पुढे गेलेला त्यांना नको आहे, हेच त्यांच्या टीकेतून दिसत आहे, असा खोचक टोला मगो पक्षाचे नेते नारायण सावंत यांनी लगावला.
पणजी येथे काल आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्याच्यासोबत पक्षाचे कार्याध्यक्ष प्रताप फडते व सचिव अनंत नाईक उपस्थित होते. जनमत कौलाला मगोने पाठिंबा दिला होता. त्यावेळीही मगोची तीच भूमिका होती व आताही तीच आहे. मगो पक्षाचे १७ वर्षे सरकार होते. मात्र, कधीही पक्षाने भाषेवरून भेदभाव केला नाही. मात्र, आता पुन्हा एकदा कोंकणी व मराठीवरून भाषावाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका सावंत यांनी केली.
सावंत म्हणाले की, मगो पक्षाचे सरकार असताना हिंदू, ख्रिश्चन यांच्यात भाषेवरून कधीही वाद पेटला नाही, कारण भाऊसाहेब बांदोडकर हे सर्वांना एकत्र घेऊन काम करायचे. मगो सरकारने कधीही भाषेवरून कोणाचाही द्वेष केला नाही. विरोधी पक्षाने सुद्धा सरकारच्या हातात हात घालून राज्याच्या विकासासाठी काम केले आहे.
कोंकणी व मराठीवरून कधीही दुजाभाव केला नाही. कोंकणी व मराठीला समान दर्जा मिळावा असेच वाटते. कोंकणी नको असे मगोने कधीच म्हटले नाही. आम्ही नेहमीच संस्कृती सांभाळली व कुणावरही भाषा लादली नाही. उदय भेंब्रे यांचा केवळ निषेध करीत नसून, त्यावर आमची आमची भूमिका ठामपणे मांडणार आहे. त्यासाठी लवकरच पक्षाची कार्यकारिणी बैठक बोलावली जाईल. मगोने कोकणीचा विकास केला नाही, अशी टीका होत आहे. हे चुकीचे आहे.
आमदार होताना भूमिका चुकीची वाटली नाही?
भेंब्रे आता भाषावादाला खतपाणी घालत आहेत. त्यांनी विलिनीकरणाच्या विषयावरून गोव्याचे पैसे, संपत्ती संपली, असे विधान केले आहे. तसे काहीच नाही. उलट भेंब्रे हे मगो पक्षाच्या मतांवर तेव्हा आमदार म्हणून निवडून आले होते, तेव्हा त्यांना मगोची भूमिका चुकीची वाटली नव्हती का? अशी टीका त्यांनी केली.
भाऊंनीच अस्मिता जपली : सुदिन ढवळीकर
वीजमंत्री व मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते सुदिन गढवळीकर काल 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, मुक्तीनंतर गोव्यात भारतीय संस्कृती व भारतीय अस्मिता जपण्याचे काम भाऊसाहेब बांदोडकर व मगो पक्षाने केले. मुंडकारांच्या घरांचे रक्षण व्हावे, कुळांच्या जमिनींचे रक्षण व्हावे म्हणून भाऊ, शशिकलाताई व मगो पक्षाच्या सरकारने कायदे केले. भाटकारशाहीचे वर्चस्व मगोपच्या सरकारने एकेकाळी मोडून काढले. यामुळे काही जणांचा अजून जळफळाट होतोय. सासष्टीतील मगोविरोधकांपैकी काही जण एकदाच आमदार झाले व मग लोकांनी त्यांना कायमचे दूर केले.