लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: "आजच्या युवकांना साहित्य, संस्कृतीविषयी प्रेरणा देण्यासाठी शिक्षक, पालकांनी योग्य मार्ग दाखवला तर निश्चितपणे साहित्याच्या माध्यमातून मानवी जीवन समृद्ध करण्याची ताकद निर्माण होईल. सकस साहित्य निर्मितीसाठी युवकांनी पुढाकार घ्यावा' असे आवाहन रविवारी पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते व इतिहास अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी केले. डिचोलीत रविवारी आयोजित युवा संमेलनात ते बोलत होते.
गोवा मराठी अकादमीचा डिचोली प्रभाग व विद्यावर्धक मंडळाचे श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त युवा मराठी साहित्य संमेलन २०२५ चे उद्घाटन दीनदयाळ सभागृहात झाले. व्यासपीठावर विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई, दिनेश मयेकर, प्राचार्य अनिता आगरवाडेकर, उपप्राचार्य विजयकुमार नाझरे, गोवा मराठी अकादमीचे डिचोली प्रभाग अध्यक्ष सोमनाथ पिळगावकर आदी उपस्थित होते.
राजेंद्र केरकर म्हणाले, 'आपल्या पूर्वजांचे समृद्ध संचित जपण्यासाठी, साहित्याला नवीन आयाम देण्यासाठी डिचोलीच्या वैभव संपन्न परिसराचा शोध घेणे गरजेचे आहे. युवकांनी इतिहासाचा शोध घेण्याचा ध्यास घ्यावा. डिचोली ही अनेक मान्यवरांची, कर्तबगारांची भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांसारख्या थोर महापुरुषांचे पाय या ऐतिहासिक भूमीला लागले आहेत, त्या इतिहासाचा युवकांनी अभ्यास करावा, शोध घेऊन तो उजेडात आणावा.'
राजेंद्र केरकर म्हणाले की, 'ज्येष्ठ साहित्यिक जयवंत सरदेसाई यांच्यासह अनेकांनी डिचोलीच्या वैभवशाली इतिहासाचा खजिना साहित्यामधून जनतेसमोर आणला आहे. तोच धागा पकडून आजच्या युवकांनी इतिहास, साहित्य, संस्कृतीचा अभ्यास करत विविध ठिकाणी भ्रमंती करावी. सृष्टीचा अभ्यास करावा. समाज जीवन, इतिहास हे संस्कृतीचे दुवे आहेत, ते शोधण्याचा प्रयत्न करावा.
केरकर यांनी निमुजगा, नार्वे सप्तकोटेश्वर, लामगाव पाजवाडा, अवचित वाडा यांसह तालुक्यातील विविध ठिकाणच्या इतिहासाचे दाखले दिले. युवकांनी साहित्य निर्मितीची प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देत त्याचा अभ्यास करून साहित्य निर्मिती करणे शक्य आहे, याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी इशस्तवन सादर केले. दीप प्रज्वलन करण्यात आले. स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
प्राचार्य अनिता आगरवाडेकर यांनी साहित्य हा संस्कृतीचा आत्मा आहे. साहित्य दिशा देण्याचे, प्रेरणा देण्याचे व विद्यार्थ्यांच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवून क्रांती घडवणारे उत्तम माध्यम आहे' असे स्वागतपर भाषणात स्पष्ट केले.
सोमनाथ पिळगावकर यांनी प्रास्ताविकात मराठी साहित्य संमेलनाचा उद्देश स्पष्ट केला. दुसऱ्या सत्रात मराठी साहित्याने मला काय दिले? या विषयावर प्रा. डॉ. स्नेहा प्रभू महांबरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष परिसंवाद झाला. त्यात स्नेहा सुतार, अनघा गवस, स्वरांगी मराठे, रुही गर्दै यांनी सहभाग घेतला.
डॉ. स्नेहा म्हांब्रे यांनी 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे ध्यानात ठेवून युवकांनी कल्पनाशक्तीला चालना देत वाचन-मनन व चिंतन याच्या माध्यमातून साहित्य निर्मिती करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आजच्या युवकांनी मराठीची पालखी सक्षमपणे पेलण्यास पुढाकार घेऊन कार्यरत राहावे' असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर डॉ. अनुजा जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन बरेच रंगले. संमेलनात निमंत्रित कवी व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयावर कविता सादर करून उपस्थितांकडून वाहवा मिळवली.
समारोपसत्रात गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी, 'ज्या तरुणांना चांगले लिहायचे आहे, त्याला चांगले शुद्ध व बुद्ध होऊन जगता आले पाहिजे. चांगले साहित्य निर्माण होण्यासाठी अर्थपूर्ण जीवन जगणे गरजेचे आहे. त्यासाठी सकस साहित्य वाचा. जग सुंदर असून ते अधिक सुंदर करण्यासाठी संवेदनशील होणे गरजेचे आहे. त्यासाठी कविता वाचूया व जीवनाची कविता जगूया' असे आवाहन प्राचार्य अनिल सामंत यांनी समारोप सोहळ्यात केले.
संमेलनात मीना कानोळकर यांच्या 'स्वप्न गीत' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्राचार्य अनिल सामंत, राजेंद्र सावरकर, सूर्यकांत देसाई, सोमनाथ पिळगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सृष्टी नाईक, शुभदा कळंगुटकर यांनी सूत्रसंचालन केले.
मराठीचा समृद्ध वारसा
डॉ. स्नेहा म्हांब्रे यांनी मराठीची परंपरा खूप प्राचीन आहे. मराठीला आजही राज्यभाषेचा दर्जा मिळालेला नसला तरीही राज्यात १२ मराठी वर्तमानपत्रे नियमित चालतात. त्यामुळे मराठी अधिक समृद्ध करण्याचा वसा युवा पिढीने घ्यावा' अशा प्रकारचे आवाहन त्यांनी परिसंवादातून केला.