ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १३ - समलैंगिकांच्या हक्कांसंदर्भात देशभरात चर्चा सुरु असताना गोव्याचे क्रीडामंत्री रमेश तावडकर यांच्या मते समलैंगिकता हा बहुधा मानसिक आजार असावा असे दिसते. गोवा सरकार समलैंगिक तरुण - तरुणींसाठी एक केंद्र सुरु करणार असून यामध्ये त्यांच्यावर उपचार करुन त्यांना पुन्हा 'सामान्य' केले जाईल अशी मुक्ताफळ त्यांनी उधळली आहेत.
गोवा येथील एका कार्यक्रमात क्रीडा आणि युवा विभागाचे मंत्री रमेश तावडकर यांनी राज्याचे युवा धोरण मांडले. यात त्यांनी समलैंगिकांसाठी उपचार केंद्र सुरु करण्याची वादग्रस्त घोषणा केली. दारुचे व्यसन असणा-यांसाठी जसे व्यसमुक्ती केंद्र असते तसेच समलैंगिकांसाठीही केंद्र असतील, यामध्ये त्यांच्यावर औषधोपचार देऊन त्यांना बरे केले जाईल असे तावडकर यांनी सांगितले. तावडकर यांच्या विधानावर समलैगिंकांच्या हक्कांसाठी लढणा-या समाजसेवी संस्थांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. काही दिवसांपूर्वी योगगुरु बाबा रामदेव यांनीदेखील समलैंगिकता हा आजार असून योगद्वारे तो बरा करता येतो असे म्हटले होते. तावडकर यांनीदेखील अप्रत्यक्षरित्या रामदेव यांच्या सूरात सुर मिसळून वाद ओढवून घेतला आहे.