पणजी : राज्यातील ११ नगरपालिकांच्या १५९ प्रभागांसाठी रविवारी निवडणूक होत आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेस आरंभ होणार आहे. मतमोजणीचे काम मंगळवारी पार पडेल. त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे. पणजी महापालिका, साखळी व फोंडा पालिका वगळता अन्य सर्व पालिकांच्या निवडणुका होत आहेत. यात मडगाव, वास्को, केपे, सांगे, कुडचडे-काकोडा, काणकोण, कुंकळ्ळी, पेडणे, डिचोली, वाळपई व म्हापसा या पालिकांचा समावेश आहे. एकूण २ लाख ३७ हजार मतदार ६८५ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. भाजपने अकराही पालिका क्षेत्रांमध्ये उमेदवार उभे करून पॅनल्स जाहीर केली आहेत. काँग्रेसच्या आमदारांनी व काही अपक्ष आमदारांनी स्वत:चे उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. पक्षाच्या निशाणीवर या निवडणुका होत नसल्या, तरी भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी पूर्णपणे पालिका निवडणुकीच्या प्रचार कामात स्वत:ला झोकून दिले. आमच्या पक्षाने कुठेच उमेदवार उभे केलेले नाहीत किंवा कुणाला पाठिंबाही दिलेला नाही, असे प्रदेश काँग्रेस समितीचे म्हणणे आहे. मतदानावेळी मतपत्रिकांचा वापर केला जाणार आहे. शनिवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात मतपेट्या मतदान केंद्रांवर पाठविण्यात आल्या. २०१० साली पालिका निवडणुका झाल्या होत्या, त्या वेळी ७५ टक्के मतदान झाले होते. (प्रतिनिधी)
अकरा पालिकांसाठी आज मतदान
By admin | Updated: October 25, 2015 02:10 IST