पणजी : गेल्या वर्षी फुटबॉल सामने पाहण्यासाठी ब्राझिलच्या दौऱ्यावर गेलेल्या तीन आमदारांनी अखेर बुधवारी गोवा क्रीडा प्राधिकरणाकडे खर्चाचे पैसे जमा केले. वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा वगळता मंत्री आवेर्तान फुर्तादो, आमदार ग्लेन टिकलो व बेंजामिन सिल्वा यांनी मिळून बुधवारी ३७ लाख रुपयांचा खर्च सरकारला परत केला. गेले नऊ महिने आमदारांच्या ब्राझील दौऱ्याचा विषय गाजला. विदेश दौऱ्यावरील खर्चावर बरीच टीका झाली. विदेश दौऱ्याचे पैसे भरण्यास आमदार तयार नसल्याने गोवा क्रीडा प्राधिकरणाने (सॅग) मंगळवारी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर बुधवारी धावपळ करत तीन आमदारांनी मिळून ३७ लाख रुपये शासकीय तिजोरीत जमा केले. बेंजामिन व टिकलो यांनी मिळून प्रत्येकी १२ लाख ८४ हजार ८१५ रुपयांचा धनादेश बुधवारी सॅगला दिला, तर मंत्री फुर्तादो यांनी ११ लाख ८४ हजार रुपये भरले. फुर्तादो यांनी यापूर्वी तीन लाख, तर बेंजामिन, कार्लुस व ग्लेन यांनी मिळून प्रत्येकी दोन लाख रुपये भरले होते. कार्लुस यांनी मात्र अजूनही उर्वरित पैसे भरलेले नाहीत. ब्राझील दौऱ्यावर गेलेल्या प्रत्येक आमदारास सॅगने १४ लाख ८४ हजार ८१५ रुपये भरण्यास सांगितले होते. गेल्या वर्षी मंत्री रमेश तवडकर व मिलिंद नाईक यांनी ऐनवेळी ब्राझील दौऱ्यावर न जाण्याची भूमिका घेतली; पण त्यांच्या नावे विमानाचे तिकीट काढले गेले होते. (खास प्रतिनिधी)
तीन आमदारांनी विदेश दौऱ्यावरील खर्च भरला
By admin | Updated: March 12, 2015 01:54 IST