पणजी : दारूच्या नशेत कार चालविताना महिलेने दुचाकीस्वारांना ठोकर दिल्याने जखमी झालेला दुचाकीस्वार संदीप कुट्टीकर हा वाहन चालविण्याचा परवाना नसताना दुचाकी चालवीत असल्याचे उघड झाले आहे. यामुळे उभय पक्षांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. २१ जुलै रोजी रात्री कांपाल येथे दयानंद बांदोडकर मार्गावर नशेत कार चालविणाऱ्या शोभिका कौर हिने दुचाकीस्वारांना ठोकर दिली होती. त्यामुळे दुचाकीचालक संदीप कुट्टीकर व कैसर ब्रागांझा जखमी झाले होते. कारचालक महिला आल्कोमीटर चाचणीत दोषी आढळली होती, तर आता दुचाकीचालकही परवान्याशिवाय वाहन हाकत असल्यामुळे अडचणीत आले आहेत. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या पणजी पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली. या घटनेचा पंचनामा केल्यानंतर कौर हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता दुचाकीचालकावरही गुन्हा दाखल करण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघाताचे पडसाद विधानसभेतही उमटले होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. ३० टक्क्यांहून अधिक अपघात हे केवळ नशेत वाहने चालविल्यामुळे होत असल्याचे पोलीस खात्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात म्हटले आहे. अपघातांना आमंत्रण देणाऱ्या नशेबाज चालकांवर मात्र कारवाई होण्याचे प्रकार कमीच आहेत. २०१३ सालच्या आकडेवारीप्रमाणे दारूपिऊन वाहने चालविणाऱ्या १७९ जणांना दंड ठोठावण्यात आला होता. चालक परवाना नसतानाही वाहने चालविणाऱ्यांचे प्रमाणही गोव्यात फार वाढले आहे. अशा अनेक चालकांना वाहतूक खात्याकडून तालाव ठोठावण्यात आल्याच्या नोंदी वाहतूक खात्याकडे आहेत. (प्रतिनिधी)
‘त्या’ अपघातग्रस्त दुचाकीस्वाराकडे नव्हते लायसन्स
By admin | Updated: August 8, 2014 02:25 IST