लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : यंदाचा हंगाम काजू तसेच आंबा पिकाला लाभदायक राहणार आहे. काजूला लाभदायक अशी थंडी तसेच उष्णता असून, ग्रामीण भागात कलमी काजूला चांगला बहर आला आहे. त्यामुळे यंदा चांगले पीक येण्याची शक्यता कृषी खात्यातर्फे वर्तविली आहे.
राज्यात ग्रामीण भागात कलमी काजूला बहर आला असून, काही ठिकाणी या बहराला काजूगरही आले आहेत. गेले अनेक दिवस पडणारी थंडी ही काजू पिकाला लाभदायक आहे. त्यामुळे या बहराला चांगले काजू पीक येणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी काजूचे पीक चांगले येण्याची शक्यता आहे. आता काजू हंगाम सुरू झाला आहे.
आंब्यालाही चांगला बहर
राज्यात काजू बागायतीप्रमाणे आंब्याच्याही मोठ्या बागायती आहेत. मानकुराद आंब्याला तसेच इतर आंब्यांना चांगली मागणी असते. यावर्षी आंबा पिकाला चांगला बहर आला असून, याचा फायदा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. आंब्याचे पीक हे एप्रिल मे महिन्यापर्यंत मिळते. पण, आतापासूनच बहर आला आहे. त्यामुळे आंब्याचे पीक वाढण्याची शक्यता आहे.
चांगले वातावरण लाभदायक : कृषी संचालक
कृषी खात्याचे संचालक संदीप फळदेसाई म्हणाले, यावर्षी आतापर्यंत काजू, आंब्याला चांगला बहर आला आहे. सध्या पडत असलेली थंडी ही काजू पिकाला लाभदायक ठरली आहे. त्यामुळे बहुतांश कलमी काजूंना चांगला बहर आला आहे. तसेच गावठी काजूही चांगले बहरले आहेत. कलमी काजू पीक हे अगोदर मिळत असते, तर गावठी काजूचे पीक हे एप्रिल, मे महिन्यात जास्त मिळत असते.