समीर नाईक - पणजी, गोवा: कांपाल येथील परेड मैदानावर स्थलांतरीत करण्यात आलेला सांतीनेझ येथील वटवृक्ष, पुन्हा एकदा कांपाल येथे जवळपास ५० मीटर अंतरावर हलविण्यात आला. गेल्या दोन दिवसात दोन ठिकाणी सदर वटवृक्ष हलविण्यात आल्याने हा वटवृक्ष या उन्हाळ्यात जगणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्मार्ट सिटीच्या कामात अडथळे ठरत असल्याचे सांगत सांतीनेझ येथील दोनशे वर्षे जुने असलेला तो वटवृक्ष शुक्रवारी मध्यरात्री कापण्यात आला व शनिवारी मुळासहीत उपळुन कांपल कांपाल येथील परेड मैदानावर लावण्यात आला होता. जेथे सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल मैदान होत आहे. पण या ठिकाणी वटवृक्षाचे मूळ लावण्यात आल्यानंतर स्मार्ट सिटी प्रशासनाच्या लक्षात आले की त्या ठिकाणी एक मंदिर येणार असल्याने, पुन्हा रविवारी मध्यरात्री हे मूळ हटविण्यात आले आणि तेथूनच ५० मीटर अंतरावर लावण्यात आले. जे आंतरराष्ट्रिय फुटबॉल मैदान प्रकल्पाचे लॉन आहे. या सर्व घडामोडीतून पुन्हा एकदा स्मार्ट सिटीची बेशिस्त कामे आणि नियोजनाचा अभाव स्पष्टपणे दिसून आले.
वारंवार सदर वटवृक्ष स्थलांतरीत करण्यात आल्याने मुळांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. सध्याची जागा पाहता भविष्यात पुन्हा एकदा या वटवृक्षाचे स्थलांतरीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वटवृक्षाच्या जखमांवर मातीचा लेप वटवृक्षाचे दुसऱ्यांदा स्थलांतरीत केल्यानंतर स्मार्ट सिटीतर्फे या झाडावर कुठे कुठे कुऱ्हाडीने वार करून फांद्या कापण्यात आल्या त्यासर्व ठिकाणी ओल्या मातीचा लेप लावण्यात आला. उन्ह खूप असल्याने हे झाड सुकून न जावे यासाठी असे करण्यात आल्याचे सांगितले जाते. सध्याच्या स्थितीत हे वटवृक्ष जगविण्यासाठी स्मार्ट सिटीला खूप काम करावे लागणार आहे. या झाडाला निदान एक टँकर पाणी रोज द्यावे लागणार आहे, तसेच इतर काळजी घ्यावी लागणार आहे.