पणजी : राज्यातील पहिली महिला चालक टॅक्सी सेवा गुरुवारपासून सुरू होणार आहे. त्यामुळे प्रथमच महिलांकडून टॅक्सी चालविली जात असल्याचे पाहायला मिळणार आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाने पुढाकार घेऊन पहिली महिला टॅक्सी सेवा अस्तित्वात आणली आहे. प्रथम या सेवेखाली दहा टॅक्सी असतील. या टॅक्सीच्या चालक महिला असतील. प्रवासीही महिलाच असतील. पुरुष प्रवाशांसाठी त्या वापरल्या जाऊ नयेत असे नाही; पण चालक महिला असल्याने प्रवासीही साहजिकपणे महिला असतील, असे वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले. गोव्यात महिला टॅक्सी सेवेचा प्रयोग कधीच करण्यात आला नव्हता. खास महिलांसाठी बसगाड्यांचा प्रयोग यापूर्वी करण्यात आला होता; पण त्यास नंतर मोठासा प्रतिसाद मिळू शकला नाही. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता मिरामार येथील मिरामार रेसिडेन्सीजवळ महिला टॅक्सी योजनेचा आरंभ होणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर, पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, आमदार नीलेश काब्राल, वाहतूक संचालक देसाई, मुख्य सचिव आर. के. श्रीवास्तव, प्रधान सचिव परिमल रे या वेळी उपस्थित असतील. दरम्यान, सर्व दहाही टॅक्सी चालविणाऱ्या महिला या गोमंतकीयच असतील व आम्ही त्यांना प्रशिक्षणही देणार आहोत, असे पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन काब्राल यांनी सांगितले. गोव्याच्या वाहतूक खात्यानेच या महिलांना वाहतूक परवाना दिला आहे. महिला टॅक्सी सेवेमुळे महिलांचे सबलीकरण होईल. या टॅक्सींमधील सगळेच प्रवासी महिला असाव्यात, असे काही नाही. मात्र, एक तरी महिला प्रवासी असावी अशी अट आहे, असे काब्राल यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)
राज्यात महिला चालकांची टॅक्सी सेवा उद्यापासून
By admin | Updated: October 15, 2014 01:32 IST