लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणे : धारगळ येथे सनबर्न होऊ नये अशा प्रकारचा निर्णय पूर्वी ग्रामसभेने घेतला तरी, धारगळ पंचायत मंडळाने मात्र सोमवारी लोकभावनेची कदर केली नाही. पंचायत मंडळाने बैठकीत पाचविरुद्ध चार मतांनी निर्णय घेत धारगळ येथे सनबर्न आयोजित करण्यास मंजुरी (प्रोव्हिजनल) दिली. सरकारच्या दबावापुढे पंचायत नमली हे लोकांच्याही लक्षात आले. मात्र, हा विषय येथे संपला नसून आमदार प्रवीण आर्लेकर व इतरांनी याविरुद्ध लढा सुरू ठेवण्याचे अगोदरच ठरवले आहे.
बैठकीवेळी विरोधी पंचांनी खास ग्रामसभा बोलावून यावर चर्चा करावी, अशी मागणी केली. ग्रामस्थांना जर सनबर्न महोत्सव हवा असेल तर त्याला आमची संमती असेल, असे पंच सदस्य भूषण नाईक, पंच सदस्य अमिता हरमलकर व अनिकेत साळगावकर यांनी सांगितले.
रविवारी आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी या महोत्सवाला विरोध केला. सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी आर्लेकरांचे अभिनंदन करत महोत्सवाला विरोध असल्याचेही जाहीर केले तर दुसऱ्या बाजूने सरपंच, उपसरपंच, पंच सदस्यांनी महोत्सवाच्या समर्थनार्थ सभा घेतली.
आता काय घडते ते बघाच!
धारगळ पंचायतीने सनबर्नला मान्यता देणारा ठराव घेतल्यानंतर स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांना विचारले असता ते म्हणाले की, पंचायतीने ठराव घेऊन काहीही होत नाही. तुम्ही थांबा आणि पाहा. सनबर्नची तयारी सुरू होऊ द्या, मग काय घडते ते बघाच. धारगळमध्ये या महोत्सवाला तीव्र विरोध असतानाही सनबर्न या ठिकाणी कसा होतो हेच आता मला बघायचे आहे. त्यामुळे लवकरच आपणाला समजेल, असा थेट इशाराच त्यांनी दिला आहे.
सगळे वरुनच ठरले आहे...
सरपंच सतीश धुमाळ यांनी सांगितले की, आमच्यावर सरकारचा दबाव नाही. सनबर्नमधून स्थानिकांना रोजगार मिळेल, टॅक्सी, मोटारसायकल पायलटांनाचाही व्यवसाय चालेल हाच हेतू आहे. पण, धारगळ येथे सनबर्न महोत्सवाला 'वरून'च परवानगी मिळाली आहे. लोक आमच्यावर रोष व्यक्त करत असले तरी परवानगी देण्याबाबत आमच्या हातात काहीही नाही. आम्हाला बळीचे बकरे बनवले जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
सनबर्न उधळून लावू
धारळगवासीयांना सनबर्न महोत्सव नको असताना सरपंचांसह काहीजण तो लादत आहेत. लोकांना विश्वासात न घेता पंचायत मंडळाने जो ठराव मंजूर केला तो आम्हाला अमान्य आहे. त्यामुळे ज्या दिवशी सनबर्नचे आयोजन करण्यात येणार आहे, त्याचदिवशी आम्ही त्या ठिकाणी घुसून सनबर्न उधळून लावू, असा इशारा पंच सदस्य भूषण ऊर्फ प्रदीप नाईक, अनिकेत साळगावकर यांनी दिला.
ग्रामस्थ संतप्त
पंचायत मंडळाने ठराव मंजूर केल्यानंतर ग्रामस्थांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ज्येष्ठ नागरिक रोहिदास हरमलकर म्हणाले की, सनबर्न ही आमची संस्कृती नव्हे. पेडणे तालुक्यात मंदिरे मोठ्या प्रमाणात आहेत. संस्कृतीचा वारसा जोपासणारा तालुका म्हणून पेडण्याची ओळख आहे. मात्र, अशा महोत्सवातून संस्कृतीवर घाला घातला जाईल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
'दबंग एन्ट्री' अन् दंड...
सनबर्न म्युझिक महोत्सवाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी बोलावलेली धारगळ पंचायतीच्या पंचायत मंडळाची बैठक जशी गाजली, तशीच या बैठकीसाठी उपस्थित राहिलेल्या काही पंच सदस्यांची एन्ट्री हा चर्चेचा विषय ठरला आहे. पंच सदस्य अर्जुन कानोळकर बैठकीला 'टिंटेड' काचा असलेल्या आपल्या जीपमधून आले. पोलिसांसमोरच त्यांनी आपली जीप उभी केली आणि बैठकीला आत गेले. त्यांचा गाडीसह व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर पेडणे पोलिसांनी जीपच्या मालकाला १००० रुपये दंड ठोठावला आहे. मालकाचे नाव पूजा कानोळकर असे असून चालकाचे नाव वल्लभ वराडकर असे आहे.