फोंडा-डिचोली : आमोणा-डिचोली येथील सेसा कंपनीच्या गेटसमोर उसाचा रस काढणाऱ्या रतन करोल (मूळ रा. राजस्थान) याचे अपहरण आणि खूनप्रकरणी डिचोली पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघा संशयित आरोपींपैकी एकाने भामई आउटपोस्टमधील कोठडीतच गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर यांनी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळीला पाठवून दिला. शनिवारी उत्तरीय तपासणीनंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. पंचनाम्यावेळी मृतदेहावर कोणत्याही जखमा किंवा वळ आढळले नसल्याचे ते म्हणाले. प्राप्त माहितीनुसार, रतन करोल याचे अपहरण झाले होते. याप्रकरणी डिचोली पोलिसांनी पोलीस शिपाई देविदास सिनारी आणि दत्तगुरू सिनारी या सख्ख्या भावांना संशयावरून ताब्यात घेतले होते. त्यांची चौकशी सुरू असताना डिचोली पोलिसांनी देविदासला भामई-पाळी येथील आउटपोस्टमध्ये आणून ठेवले होते. शुक्रवारी सकाळी देविदासचा भाऊ त्याला भेटण्यासाठी आला असता, कोठडीची रखवाली करणाऱ्या पोलिसाने त्याला हाका मारल्या. मात्र, त्याने प्रत्युत्तर न दिल्याने कोठडी उघडण्यात आली. त्या वेळी पोलिसांना कोठडीतील शौचालयाचे दार बंद दिसले. अनेकवेळा हाका मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी दरवाजा तोडला. तेथे देविदासने जीन्स पँटच्या सहाय्याने शौचालयातील फ्लॅशच्या लोखंडी खुंटीला गळफास घेतल्याचे दिसले. याबाबत डिचोलीचे पोलीस उपअधीक्षक रमेश गावकर यांनी सांगितले की या अपहरण प्रकरणातील या संशयिताला चौकशीसाठी आउटपोस्टमध्ये आणले होते. सकाळी त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी (पान २ वर)
पोलीस शिपायाची कोठडीत आत्महत्या
By admin | Updated: December 26, 2015 01:46 IST