मडगाव : पे्रमभंग झाल्याची भावना निर्माण झाल्याने कुंकळ्ळीतील एका १७ वर्षीय मुलीने गुरुवारी सायंकाळी आपल्या घरात दुपट्ट्याने फास लावून आत्महत्या केली. देमानी-कुंकळ्ळी येथे गुरुवारी दुपारी ३ ते सायंकाळी ७ च्या दरम्यान हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे, त्या मुलीने घराचा दरवाजा बंद करून आत्महत्या केली. ही मुलगी नावेली येथील रोझरी उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावीत शिकत होती. या घटनेची पार्श्वभूमी अशी, या मुलीचे एका युवकाशी प्रेमसंबंध होते. एका महिन्यापूर्वी ती त्याच्यासोबत कर्नाटकात पळून गेली होती. तिच्या वडिलांनी यासंबंधी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर कुंकळ्ळीचे उपनिरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी कर्नाटकात जाऊन त्या युवकाला अटक केली होती. त्या युवकावर सध्या बलात्काराचा खटलाही चालू आहे. याच कारणामुळे मानसिक दडपणाखाली येऊन तिने ही आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, आत्महत्या करण्यासंदर्भात कुठलीही चिठ्ठी त्या मुलीने लिहून ठेवलेली नाही, अशी माहिती मिळाली आहे. (प्रतिनिधी)
अकरावीतील विद्यार्थिनीची प्रेमप्रकरणातून आत्महत्या
By admin | Updated: February 6, 2015 01:43 IST