लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोवा जशी कलाकारांची भूमी आहे, तशीच ती विचारवंतांचीही भूमी आहे. डी. डी. कोसंबी विचार महोत्सवाच्या माध्यमातून आपणाला विचारवंतांना ऐकण्याची संधी मिळते. त्यांचे विचार आत्मसात करून प्रत्येक गोमंतकीयाने विकसित गोवा मोहिमेला बळ द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
कला व संस्कृती खात्यातर्फे कला अकादमीच्या दीनानाथ मंगेशकर सभागृहात आयोजित १४व्या डी. डी. कोसंबी विचार महोत्सवात ते बोलत होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध वक्ते गौर गोपाल दास, खात्याचे सचिव सुनील आंचपिका, संचालक सगुण वेळीप उपस्थित होते.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी प्रमुख वक्ते गौर गोपाल दास यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, जसे विमान टेक आऊट करते आणि नंतर विमानतळावर लैंडिंग करते तसेच जीवन आहे. विमानाचे यशस्वी लैंडिंग करणे आपल्या हातात नसते. कधी-कधी ते रनवेवर अपघातग्रस्त होते. तसेच जीवन यशस्वी लैंडिंग न करता म्हणजे आत्महत्या लोक करतात. म्हणून हा प्रवास सुखकारक होण्यासाठी सत्य ऐका, सत्य बोला, असे गौर गोपाल दास म्हणाले.
मंगळवारी (दि. २५) प्रसिद्ध कादंबरीकार अलका सरावगी यांचे 'अँड ईट सेज, सेव्ह मी फ्रॉम सुसाईड' या विषयावर व्याख्यान होणार आहे.
ताणतणाव सोडा; समजून घ्या
जीवन हे खूप सुंदर असून ताणतणाव घेऊन ते उदध्वस्त करू नका. आपल्या जीवनाचा प्रवास यशस्वी, सुंदर करायचा असेल तर ताणमुक्त जीवन जगा. स्पर्धात्मक जीवनात प्रत्येकजण यशस्वी होण्यासाठी ताण घेत आहे. मात्र, पालकांनी मुलांना तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजून घ्यायला हवे.
सभागृह हाऊसफुल्ल
गौर गोपाल दास यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी कला अकादमीचे दीनानाथ मंगेशकर सभागृह भरले होते. तर अनेक श्रोत्यांनी उभे राहून त्यांचे विचार ऐकले. तसेच कला अकादमी बाहेर स्क्रिन लावण्यात आली होती. त्या ठिकाणीही मोठी गर्दी होती.