पणजी : लुईस बर्जर कंपनीकडून गोव्यातील मंत्र्यांना देण्यात आलेल्या ६ कोटी रुपयांच्या कथित लाचप्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. तपास करण्याबाबत सरकारकडून सूचना मिळाल्यानंतर सीआयडीने सार्वजनिक बांधकाम खात्याकडून या प्रकरणातील फाईल्स मागविल्या आहेत. केंद्र सरकार आणि जपान सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून गोव्यात २००३ पासून राबविण्यात येत असलेल्या पाणीपुरवठा व मलनिस्सारण विषयक ‘जैका’ प्रकल्पाचे काम मिळविण्यासाठी गोव्यातील त्यावेळच्या मंत्र्यांसह सरकारी अधिकाऱ्यांना सहा कोटी रुपयांची (९.७६ लाख डॉलर) लाच दिल्याच्या प्रकरणात प्राथमिक चौकशी करून अहवाल देण्याची सूचना सरकारने पोलिसांना केली आहे. या प्रकरणी प्राथमिक तपास करण्याचे काम पोलीस मुख्यालयातून गुन्हा अन्वेषण विभागावर सोपविण्यात आले आहे. याविषयी बोलताना पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी या प्रकरणात सर्व शक्याशक्यतांविषयी अभ्यास सुरू असल्याचे सांगितले. गोव्यातील ‘जैका’ प्रकल्पासाठी लुईस बर्जर कंपनीला सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्या वेळी या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून तत्कालीन मंत्र्याला लाच देण्यात आल्याचे अमेरिकेतील न्यायालयात कंपनीकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ज्या काळात ही लाच देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे, त्या वेळी गोव्यात काँग्रेसचे सरकार होते व ते कंत्राट सार्वजनिक बांधकाम खात्याकडून देण्यात आले होते. चर्चिल आलेमाव हे या खात्याचे मंत्री होते. मंत्र्याला लाच देण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटल्यामुळे चर्चिल अडचणीत आले असून त्यांचीही चौकशी होणार, हे उघड आहे. (प्रतिनिधी)
सीआयडी तपास सुरू
By admin | Updated: July 21, 2015 02:16 IST