पणजी : बुधवार दि. १६ रोजी साळावली पाणी प्रकल्पात महत्त्वाचे दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार असल्याने काणकोण वगळता दक्षिण गोव्यातील सर्व तालुक्यांना पाणीपुरवठा होणार नाही. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. बांधकाम खात्याच्या विभाग-१२च्या (पीएचई) कार्यकारी अभियंत्याने जारी केलेल्या आदेशानुसार दक्षिणेत सांगे, केपे, सासष्टी व मुरगाव तालुक्यात पाणीपुरवठा होणार नाही. काणकोण तालुक्यातील गावांना चापोली धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या तालुक्यातील लोकांना समस्या येणार नाही; परंतु दक्षिण गोव्यातील चार मोठ्या तालुक्यांना पाणी मिळणार नसल्याने गृहिणींना पाण्यासाठी पायपीट करावी लागेल. बांधकाम खात्याचे प्रधान मुख्य अभियंता दत्तात्रय बोरकर यांना विचारले असता, अर्धा दिवस पाणी बंद राहणार असल्याने त्याची झळ दक्षिणेतील लोकांना पोहोचेल हे त्यांनी मान्य केले. अतिरिक्त टँकर्सची व्यवस्था केली आहे का, असा प्रश्न केला असता, अन्य माध्यमांद्वारे शक्य तितका पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न करू, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
दक्षिण गोवा उद्या कोरडा
By admin | Updated: December 15, 2015 01:44 IST