पणजी : नवे मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी मंगळवारी वन, पर्यावरण व पंचायत या तिन्ही खात्यांचा ताबा स्वीकारला व अधिकाऱ्यांच्या बैठका घेत कामास आरंभ केला. आर्लेकर यांनी पर्वरी येथील मंत्रालयात वन, पर्यावरण व पंचायत या तिन्ही खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या स्वतंत्रपणे बैठका घेतल्या. तिन्ही खात्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी काही सूचना केल्या. आपण यापूर्वी झालेली काही कामे व मार्गी लागलेल्या योजना यांचा आढावा घेतला. यापुढे काय करायचे आहे याविषयी आपण पुन्हा अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्याविषयी तपशिलाने बोलेन, असे आर्लेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. पंचायत खात्याची दिनदयाळ पायाभूत साधनसुविधा योजना अस्तित्वात असून या योजनेंतर्गत ३० कोटींची तरतूद सरकारने केलेली आहे. ती योजनाही बऱ्यापैकी मार्गी लावली जाईल, असे आर्लेकर यांनी नमूद केले. आर्लेकर यांनी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाटो येथील कार्यालयासही भेट दिली. तिथेही आपण मंडळाच्या अधिकाऱ्यांची पहिली बैठक घेतली व कचरा प्रश्नासह अन्य समस्यांविषयी चर्चा केली. सर्वत्र सापडणाऱ्या कचऱ्याची समस्या भविष्यात नियंत्रणात आणली जाईल. तसेच राज्याच्या पर्यावरणाचे रक्षण करण्यास आपण प्राधान्य देईन, असे आर्लेकर यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)
ताबा घेताच आर्लेकरांकडून कामास आरंभ
By admin | Updated: October 7, 2015 01:41 IST