लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्य मंत्रिमंडळात नेतृत्वबदल होण्याची शक्यता आता संपुष्टात आलेली आहे. काहीजणांनी मध्यंतरी प्रयत्न करून पाहिला तरी, नेतृत्वबदल होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे राज्य कारभार चालवत आहेत. पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांना गोव्यातील विकासाबाबत पूर्ण पाठिंबा आहे. यापुढेही पाठिंब्याची ग्वाही पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना गुरुवारी दिल्ली भेटीवेळी दिली आहे. एक प्रकारे मुख्यमंत्र्यांना राजकीयदृष्ट्या केंद्र सरकारचे सुरक्षा कवच लाभले आहे.
मुख्यमंत्री काल सायंकाळी दिल्लीहून गोव्यात परतले. ते दिल्ली भेटीनंतर टेन्शन फ्री झाले आहेत. सरकारमध्ये नेतृत्व बदल होणार नाही, काही मंत्र्यांना तेवढा मंत्रिमंडळातून डच्चू द्यावा लागेल याची कल्पना मुख्यमंत्र्यांना आली आहे. मुख्यमंत्री बुधवार व गुरुवार असे दोन दिवस दिल्लीत होते. त्यांनी अनेक केंद्रीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. दिल्ली विधानसभा निवडणूक निकालानंतर गोव्यात मंत्रिमंडळ फेररचना होईल. मुख्यमंत्रिपदी प्रमोद सावंत हेच कायम राहतील. २०२७ ची विधानसभा निवडणूक तरी सावंत यांच्याच नेतृत्वाखाली लढविली जाईल, अशी माहिती मिळाली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्य सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच सदोदित केंद्राकडून लाभलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राज्याच्या विकासाला आणि प्रगतीला अधिक गती देण्यासाठी मोदी यांचे अमूल्य मार्गदर्शन व हातभार कायम लाभावा, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांनी केले स्मितहास्य!
केंद्रीय नेत्यांची भेट घेऊन काल सायंकाळी गोव्यात परतलेले मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना मंत्रिमंडळ फेररचनेबद्दल पत्रकारांनी विचारले असता, काहीही उत्तर न देता त्यांनी केवळ 'स्मित हास्य' केले. दिल्ली दौऱ्याबद्दल माहिती देताना मात्र ते म्हणाले की, पंतप्रधान, गृहमंत्री आणि इतर वरिष्ठ नेत्यांशी सरकारमधील काही कामांबाबत तसेच पक्षाशी संबंधित काही मुद्द्यांवर मी चर्चा केली. दाबोळी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांसोबत प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हेही होते. सावंत म्हणाले की, जेव्हा पक्ष आणि सरकार एकाच मार्गावरुन जातो तेव्हा सर्व काही सुरळीत चालते. राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला, परंतु मंत्रिमंडळ फेरबदलाबाबतच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले.