पणजी : विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे व त्यांचे पुत्र विश्वजीत राणे यांच्यावर भालचंद्र नाईक या खाण व्यावसायिकाने केलेल्या सहा कोटी रुपयांच्या खंडणीच्या आरोपांची सुमोटो पद्धतीने गंभीर दखल पोलिसांच्या विशेष तपास यंत्रणेने (एसआयटी) घेतली असून या प्रकरणी चौकशीही सुरू झाली आहे. प्रतापसिंह राणे हे मुख्यमंत्री असताना पर्ये येथे त्यांच्या मतदारसंघात खनिज खाणीचे लिज आपल्याला मिळवून देण्याची ग्वाही राणे पिता-पुत्रांनी दिली होती. त्यासाठी आपल्याकडून विश्वजीत राणे यांनी सहा कोटी रुपये स्वीकारले होते, असा आरोप भालचंद्र नाईक यांनी गेल्या आठवड्यात थेट काँग्रेस हाउसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. या आरोपांची एसआयटीने दखल घेतली आहे. एसटीआयटी ही २००७ ते २०१२ या कालावधीत झालेल्या सर्व खनिज घोटाळ्यांच्या चौकशीसाठी नेमण्यात आली आहे. एसआयटीने दखल घेऊन चौकशी सुरू केली असून यापुढे या प्रकरणी सर्व संबंधितांचे जबाब नोंदविले जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, प्रतापसिंह राणे यांनी सोमवारी पर्वरी येथे विरोधी पक्षनेत्यासाठीच्या दालनात पत्रकार परिषद घेतली. राणे म्हणाले की, नाईक यांनी काँग्रेस हाउसमध्ये येऊन माझ्यावर आरोप केले. काँग्रेस हाउसमध्ये नाईक यांचे कार्यालय आहे काय, असा प्रश्न पडतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांच्याविषयी मला काही बोलायचे नाही; पण त्यांच्या उपस्थितीत माझ्यावर नाईक यांनी केलेल्या आरोपांबाबत मी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक दिग्विजय सिंग यांच्याशी बोललो आहे. पक्षाच्या दिल्लीतील विविध नेत्यांपर्यंत हा विषय पोहोचला असून त्यांनी दखल घेतली आहे. मी मुख्यमंत्रिपद सोडून सात वर्षांचा कालावधी लोटला. नाईक यांना आरोप करण्यासाठी सात वर्षे का लागली? खाण क्षेत्रात जर कुणी घोटाळे केले, तर त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हायला हवी. मात्र, लोकशाहीत उगाच कुणाला दोषी ठरवून शिक्षा देता येत नाही. नाईक यांनी सहा कोटी रुपये रोख दिले होते की धनादेशाने दिले होते, तेही सांगितलेले नाही. (खास प्रतिनिधी)
राणेंवरील आरोपांची एसआयटीकडून चौकशी
By admin | Updated: July 1, 2014 01:45 IST