पणजी : राज्यात श्रीराम सेनेला काम करू दिले जाणार नाही, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी विधानसभेत जाहीर केले. शून्य प्रहरावेळी अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी एका तियात्र दिग्दर्शकास येत असलेल्या धमक्यांबाबतचा विषय उपस्थित केला होता. ‘आकांतवादी गोंयांत नाका’ या तियात्राच्या सादरीकरणास विरोध होत होता व ‘मुतालिक’ असे नाव सांगून एकाने आपल्यास धमकी दिल्याची तक्रार दिग्दर्शकाने केली होती. उत्तरादाखल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, मुतालिक हे हुबळी येथे राहातात. त्यांची श्रीराम सेना कर्नाटकमध्ये आहे. कर्नाटक सरकारने तिथे बंदी लागू करावी म्हणून गोव्यातील विरोधी आमदारांनी प्रयत्न करावेत. मी गोव्यात श्रीराम सेनेला काम करू देणार नाही. मुख्यमंत्री म्हणाले की, गोव्यात शांतता असल्याने काहीजण मुद्दाम नसते वाद निर्माण करत आहेत. ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक गोव्यात आले होते त्या वेळीही त्यास काहीजण आक्षेप घेत होते व आता तियात्राला आक्षेप घेतला जातो. काही वेळा तियात्रांमध्ये आक्षेपार्ह गोष्टींचा समावेश केला जातो, हेही खरे आहे. मीही तसा अनुभव घेतला आहे. कमरेखाली वार केले जातात. पर्रीकर म्हणाले की, दाणे टाकून कोंबड्यांना भांडण्यास भाग पाडण्याची एक पद्धत आहे. श्रीराम सेना व तियात्राच्या अनुषंगाने तसाच प्रकार गोव्यात सुरू आहे. प्रत्यक्षात काहीच घडलेले नाही. गोव्यात जर श्रीराम सेना आली, तर मी सेनेवर बंदी लागू करीन. (खास प्रतिनिधी)
श्रीराम सेनेला गोव्यात
By admin | Updated: August 13, 2014 01:46 IST