लोकमत न्यूज नेटवर्क, म्हापसा : 'शिवजयंती उत्सवासाठी साखळी आणि पर्वरी येथे विशेष कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांसोबतच पणजी, म्हापसा, फोंडा, वास्को, मडगाव, डिचोली या पालिका क्षेत्रातही कार्यक्रम होतील. त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल' अशी घोषणा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त म्हापसा उपजिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री खंवटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. मंत्री खंवटे यांनी गार्ड ऑफ ऑनर स्वीकारून परेडची पाहणी केली. पोलिस, एनसीसी कॅडेट्सचा यात समावेश होता.
म्हापसा येथील शाळा आणि महाविद्यालयातील एनसीसी आणि नौदल शाखा, शालेय विद्यार्थी उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी पुंडलिक खोर्जुवेकर, बार्देश उपजिल्हाधिकारी वर्षा परब, उपजिल्हाधिकारी पांडुरंग गाड, मामलेदार अनंत मळीक, सह मामलेदार तसेच नगरसेवक सुधीर कांदोळकर, माजी सभापती उल्हास अस्नोडकर, उप विभागीय पोलिस अधिकारी संदेश चोडणकर, पोलिस निरीक्षक निखिल पालेकर आदी उपस्थित होते.
मंत्री रोहन खंवटे यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले. तसेच भारतीय संविधान देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोवा प्रगती करत आहे आणि राष्ट्रासाठी योगदान देत आहे. गोवा हे कला, संस्कृती, निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असलेले राज्य आहे. गोव्याला समृद्ध राज्य बनवण्याच्या दिशेने राज्य सरकार प्रयत्नशील आहे.
पर्यटन क्षेत्र मजबूत
खंवटे म्हणाले की, सोशल मीडियावरील नकारात्मक मोहिमेनंतरही पर्यटन क्षेत्र मजबूत आहे. देशांतर्गत पर्यटकांची संख्या २२ टक्क्यांनी आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ३ टक्क्यांनी वाढली आहे. सरकार पारंपरिक उत्सवांना प्रोत्साहन देत आहे. मंदिर 'तीर्थ सर्किट' विकसित केले आहे. फार्मगुडी-फोंडा येथे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय उभारले जात आहे.
जीआय मॅपिंग सुविधाही
खंवटे म्हणाले की, गोवा हे डिजिटल भटक्यांसाठी आयटी हब बनत आहे. त्यांचा दीर्घकालीन मुक्काम स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देत आहे. मोफत वाय-फाय हॉटस्पॉटही सुरू झाले आहेत. गोव्यात फोर जी टॉवर्स आणि जीआयएस मॅपिंगसारख्या सुविधादेखील सुरू केल्या आहेत.