वाळपई : सत्तरीत माकडतापाचा उद्रेक सुरूच असून रविवारी रात्री वाळपई आरोग्य केंद्रात माकडतापाचा दुसरा बळी गेला. म्हाऊस-सत्तरी येथील जानकी गावकर (वय ७९) हिचा माकडतापाने मृत्यू झाला. तिला वाळपई रुग्णालयात दि. २९ रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. म्हाऊस येथीलच जानकी देसाई यांच्यानंतर माकडतापाचा हा या वर्षातील दुसरा बळी आहे. गेल्या वर्षी पाली येथील सहा जणांचे बळी गेले होते. दरम्यान, माकडतापाच्या रुग्णांत आणखी दोन रुग्णांची भर पडली असून एकूण संख्या ५९ वर पोहोचली आहे. गेल्या सोमवारी म्हाऊस येथे भेट देऊन उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी, माकडतापावरची लस दोन दिवसांत गोव्यात येईल व ताबडतोब प्रभावित गावांत ती दिली जाईल, अशी घोषणा केली होती. पण ती घोषणा हवेतच विरली आहे. आठ दिवस झाले, तरी लसीचा अजूनही पत्ताच नाही. वाळपई येथील आरोग्य केंद्र जागृती कार्यक्रम व रुग्णांची तपासणी करत असले, तरी त्यांना वरिष्ठ पातळीवरून कोणतेही सहकार्य मिळत नाही, असे आजपर्यंतच्या उपचार पद्धतीवरून दिसून आले आहे. आरोग्य खात्याचे वरिष्ठ अधिकारी माकडताप प्रभावित गावात पाय न ठेवण्याचा अट्टहास कायम ठेवून आहेत. गेल्या वर्षी पाली गावात माकडतापाने हैदोस घातला होता. त्याचा अनुभव आरोग्य खात्याला असतानासुद्धा आरोग्य खात्यात सुशेगादपणा दिसत आहे. (प्रतिनिधी)
माकडतापाचा दुसरा बळी
By admin | Updated: February 2, 2016 03:23 IST