लोकमत न्यूज नेटवर्क, सांगे: नेत्रावळी येथील सावरी व मैनापी धबधबा पुन्हा एकदा लोकांसाठी खुला करण्यात आला आहे. सदर धबधबे पावसाळ्यात धोकादायक ठरत असल्याने सरकारकडून ते पर्यटनासाठी बंद करण्यात आले होते. वनविकास महामंडळाच्या अध्यक्षा तथा आमदार दिव्या राणे यांनी सदर धबधबे खुले केल्याचे जाहीर केले आहे.
समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई व वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष राणे यांनी शुक्रवारी सावरी धबधब्यावर खास ऑफ रोड जीप सफारीमधून प्रवास केला. या ठिकाणी पर्यटकांना जाण्यासाठी खास ऑफ रोड जीप सुविधा सुरू केली जाणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. मंत्री फळदेसाई म्हणाले, की जानेवारी महिन्यातही हे धबधबे सुरू आहेत. त्यामुळे पर्यटकांना त्याचा आनंद घेता येईल.
'गोवा हे समुद्र किनाऱ्यासाठी ओळखले जात असले तरी त्यापलीकडेही गोवा असून, तो पर्यटकांना दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. नेत्रावळी अभयारण्यातील हे धबधबे म्हणजे निसर्गाचा आशीर्वादच असून, याद्वारे स्थानिकांनाही आर्थिक पाठबळ मिळू शकते. जर येथे पर्यटनाला वाव मिळाला तर वन खाते, वन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सुंदर अशी गॅलरी तयार करावी, जेथे ५० लोक उभे राहू शकतात तेथे हॉटेल्सची सोय असावी, तसेच अन्य सुविधा तयार करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या परिसराला पर्यटनदृष्टीने प्रोत्साहन मिळावे, त्यादिशेने सुविधा तयार करण्याचा प्रयत्न असल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.
जीपची संख्या आठपर्यंत वाढवणार : दिव्या राणे
आमदार राणे म्हणाले, की ग्रामीण भागातील लोकांसाठी रोजगाराच्या संधी तयार व्हाव्यात यासाठी ऑफ रोड जीप सफारी सुरू केली आहे. त्यावर चालकांची नियुक्ती केली आहे. यासह रेलिंग, पायऱ्या अशा सुविधाही तयार केल्या आहेत. जेणेकरून लोकांना या धबधब्याचा आनंद घेता येईल कॅटिंग सेवा, जीवरक्षक याद्वारे स्थानिकांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. या धबधब्यांकडे जाण्यासाठी ऑफ रोड जीप सफारीसाठी दोन जीप घेतल्या असून ही संख्या आठपर्यंत वाढवली जाईल.