पणजी : गोव्यातील पाच प्रमुख नद्या पर्यटनाच्या नावाखाली विकसित करण्याचा केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा प्रस्ताव हा म्हणजे जलसंपदेचा विध्वंस असल्याचे तसेच मच्छीमारी समाजाच्या पोटावर मारण्याचा प्रकार असल्याचे ‘गोंयच्या रापणकारांचो एकवोट’ या संघटनेने म्हटले आहे. या प्रस्तावाला संघटनेने विरोध केला आहे. मांडवी, जुवारी, शापोरा, म्हापसा आणि साळ नदी विकसित करून त्यातून जलवाहतूक आणि पर्यटनसंबंधी उपक्रमांना चालना देणारा केंद्राचा प्रस्ताव असून देशातील अनेक नद्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. या प्रस्तावाला राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय मच्छीमार मंचानेही विरोध केला आहे. गोंयच्या रापणकारांचो एकवोट या संघटनेने या प्रस्तावाला आक्षेप घेताना नदीतील जैविक संपदा त्यामुळे धोक्यात येणार असल्याचे म्हटले आहे. त्यात पाण्यातील विविध जाती-प्रजाती नष्ट होऊन जातील. मासेही नष्ट होऊन मच्छीमार समाजाचे पोटापाण्याचे साधन त्यांच्या हातून जाईल, असे संघटनेचे संयुक्त सचिव आॅलेन्सियो सिमॉन्स यांनी म्हटले आहे. नदीतून केले जाणारे नवीन जलमार्ग व इतर विकास हा पर्यटनासाठी असल्याचा दावा केला जात असला तरी त्यासाठी पर्यावरणाचा बळी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, तो मच्छीमारांना अस्वीकारार्ह आहे. पाण्यातील जिवांबरोबरच पक्षी आणि वन्य प्राण्यांसाठीही ती मृत्युघंटा ठरणार असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी)
नदी विकास प्रकल्प म्हणजे विध्वंस
By admin | Updated: June 5, 2015 01:50 IST