पणजी : कोट्यवधी रुपयांच्या सेझ घोटाळाप्रकरणी दक्षता खात्याच्या लाचलुचपतविरोधी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांची शुक्रवारी तीन तास चौकशी केली. या दोघांची या प्रकरणात नेमकी काय भूमिका होती हे अधिकाऱ्यांनी जाणून घेतले. सकाळी ९.३0 वाजता दोघेही आल्तिनो येथील एसीबी कार्यालयात वकिलांसह दाखल झाले. दुपारी १२.३0 वाजेपर्यंत त्यांची चौकशी चालू होती. दोघांचीही बरोबरच चौकशी करण्यात येऊन जबाब नोंदविण्यात आले. सेझच्या नावाखाली रियल इस्टेटसाठी जमिनी लाटून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. २00५ साली राणे मुख्यमंत्री व फालेरो उद्योगमंत्री असताना सेझ भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप आहे. आमदार चंद्रकांत (बाबू) कवळेकर हे त्या वेळी आयडीसीचे अध्यक्ष होते. कवळेकर यांची याआधी चौकशी झालेली आहे. शुक्रवारी राणे व लुईझिन यांनी या प्रकरणात आपली भूमिका मर्यादित असल्याचे व सर्व काही आयडीसीच हाताळत होती, असा पवित्रा घेतला. (प्रतिनिधी)
राणे, लुईझिनची तीन तास चौकशी
By admin | Updated: October 24, 2015 02:58 IST