पणजी : आम्ही अराष्ट्रीय किंवा देशविरोधी नव्हे. नौदलाचा तळ दाबोळीहून अन्यत्र हलविण्यासाठी काही वर्षांपूर्वी नौदल स्वत: तयार झाले होते. नौदल ५० हजार ३०० चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीनही देण्यास तयार झाले होते. नौदलाने शब्द राखावा व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या विषयात लक्ष घालावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी केली आहे. नौदलाचा तळ दाबोळी येथून अन्यत्र हलविणे हे देशविरोधी ठरेल, असे विधान संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्याविषयी शुक्रवारी काँग्रेस हाउसमध्ये पत्रकारांनी फालेरो यांना विचारले असता ते म्हणाले, की केंद्रात जेव्हा शरद पवार संरक्षणमंत्री होते, तेव्हा नौदल दाबोळीहून अंजदीव बेटावर आपला तळ हलविण्यास तयार झाले होते. त्या वेळी गोवा सरकार अंजदीव बेटावर नौदलास मोफत जमीन देण्यास तयार होते. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने सद्यस्थिती काय आहे व आता प्राप्त स्थितीत तळ बदलता येईल काय, याचा विचार करून नौदलाने तळ बदलण्याबाबतच्या आपल्या अगोदरच्या भूमिकेविषयी काय तो निर्णय घ्यावा. फालेरो म्हणाले, की आम्ही देशविरोधी नव्हे. दाबोळीचा विमानतळ हा नागरी सेवेसाठीच होता. लष्कर व नौदलाविषयी आम्हाला पूर्णपणे आदर आहे. दाबोळी येथील सुमारे ५० हजार चौरस मीटर जमिनीवरील दावा सोडण्याची ग्वाही नौदलाने एकेवेळी दिली होती. ती जागा मिळाली तर पार्किंगची वगैरे समस्या सुटेल. (खास प्रतिनिधी)
नौदलाचा तळ हटविणे देशविरोधी नव्हे : फालेरो
By admin | Updated: November 15, 2014 02:05 IST