पणजी : राज्याचा प्रादेशिक आराखडा खुला करणे लांबणीवर पडले आहे. आराखड्याविषयीची फाईल नगर नियोजन खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी निर्णयासाठी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याकडे पाठवून पंधरा दिवस लोटले, तरी त्याविषयी निर्णय झालेला नाही. प्रादेशिक आराखडा तालुकावार खुला केला जाईल, असे उपमुख्यमंत्री डिसोझा यांनी अलीकडे वारंवार जाहीर केले होते. सासष्टी व बार्देसमधून आराखड्याविषयी जास्त तक्रारी असल्याने त्या तालुक्यांबाबत आराखडा प्रथम खुला केला जाईल, असे उपमुख्यमंत्री डिसोझा यांनी यापूर्वी म्हटले होते. मात्र, प्रादेशिक आराखड्याविषयी शासकीय गाडी अजून पुढे जात नाही. सप्टेंबरमध्ये आराखडा खुला करण्याच्या घोषणा झाल्या, तरी आता प्रत्यक्षात आॅक्टोबर उजाडला आहे. आराखडा खुला केल्यानंतर सुधारणा व अन्य प्रक्रिया डिसेंबरमध्ये पूर्ण होतील, असाही दावा सरकार करत होते; पण आता आराखडा या महिन्यात तरी खुला होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सध्या पालिका निवडणुकीनिमित्त अकरा पालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे. तेच कारण देऊन सरकार आराखडा खुला करणे आणखी लांबणीवर टाकू शकते. काही ओडीपी खुले करण्याचा सरकारचा निर्णय वादग्रस्त ठरलेला असताना त्या वादात आणखी प्रादेशिक आराखड्याची भर नको, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतलेली असावी, असे जाणकारांना वाटते; कारण डिसोझा यांनी पाठवलेली फाईल गेले पंधरा दिवस मुख्यमंत्र्यांकडेच आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत कुठच्याच तालुक्यासाठी आराखडा खुला करता येणार नाही. मुख्यमंत्री कदाचित मंत्रिमंडळासमोर आराखड्याचा विषय मांडून अंतिम निर्णय घेऊ शकतात. (खास प्रतिनिधी)
प्रादेशिक आराखड्याचे घोडे अडले!
By admin | Updated: October 4, 2015 02:24 IST