मडगाव : गोव्यात हिंदू राष्ट्र संकल्पनेवरून वादंग माजलेले असतानाच श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर नावेली, मडगाव येथील तौसिफ द नावेली या तियात्रिस्ताने लिहिलेला तियात्र सादर करू नये, यासाठी धमक्या येऊ लागल्या आहेत. आपल्याला फोन केलेल्या व्यक्तीने स्वत:ची ओळख प्रमोद मुतालिक अशी करून दिली होती, असे या तियात्रिस्ताने मडगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या संदर्भात मडगाव पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. ज्या फोन क्रमांकावरून धमकीचे एसएमएस आले व धमकीचा फोन आला त्यांची चौकशी मडगाव पोलीस करीत आहेत. तौसिफ यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीत ९ आॅगस्ट रोजी त्यांचा ‘आकांतवादी गोंयात नाकात’ हा तियात्र मडगावच्या गोमंत विद्यानिकेतन सभागृहात दाखवला जाणार होता. या शुभारंभाच्या प्रयोगाला फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई उपस्थित राहणार होते. या तियात्रात श्रीराम सेनेचे अध्यक्ष मुतालिक यांच्यावर थेट टीका नसली तरी गोव्यात हिंदू-मुस्लीम व ख्रिश्चन यांच्यातील एकोपा टिकून राहावा, असा संदेश आहे, असे ते म्हणाले. तौसिफ यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गुरुवारी सकाळी त्यांना एक धमकीचा एसएमएस आला. त्यात हा तियात्र रंगमंचावर आणल्यास तुम्हाला आम्ही खत्म करू, अशा आशयाचा मजकूर होता. त्यानंतरही आपल्याला धमकीचे चार-पाच फोन आले. हा फोन व्यक्ती आपण एका विशिष्ट संस्थेशी संलग्न असल्याचे सांगत होते, असे ते म्हणाले. संध्याकाळीही आपल्याला आणखी एक फोन आला. त्यात फोन करणारी व्यक्ती हिंदीतून बोलत होती. तिने आपण प्रमोद मुतालिक असल्याचे सांगितले, असे ते म्हणाले. आपल्या तियात्रास संरक्षण मिळावे, यासाठी आज तौसिफ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. दरम्यान, या धमकीच्या फोनचा काँग्रेसने तीव्र निषेध केला आहे. गोव्यात एक प्रकारे तालिबानी प्रवृत्तीची सुरुवात, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
‘प्रमोद मुतालिक बोलतोय’
By admin | Updated: August 8, 2014 02:26 IST