लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करुन महात्मा गांधीचे स्वप्न सत्यात आणले आहे. त्यांच्यासाठी हीच खरी श्रद्धांजली आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आझाद मैदान, पणजी येथे शहीद दिनानिमित्त भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी आपले प्राण अर्पण केले त्यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करताना सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, वीज मंत्री सुदिन ढवळीकर व इतर अधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, 'महात्मा गांधीजींचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वच्छ भारत उपक्रमाअंतर्गत पुढे नेत आहे. या उपक्रमाचे फायदे हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचले आहेत. आज गांधीजींचे स्वप्न पंतप्रधानांनी सत्यात उतरवून दाखवले ही त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे. आपण फक्त श्रद्धांजली नाही तर स्वातंत्र्यसैनिकांचे आचार विचार पुढे नेले पाहिजे. राज्य सरकार तसेच केंद्र सरकार यासाठी काम करत आहे.
यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई आणि वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आझाद मैदानावर शहीद दिनानिमित्त श्रद्धांजली वाहिली.