ऑनलाइन टीम
पणजी, दि. १४ - गोव्याच्या दौ-यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी देशाचे सागरी सामर्थ्य वाढवणा-या ‘आयएनएस विक्रमादित्य‘ या विमानवाहू नौकेची पाहणी केली. यावेळी पंतप्रधान मिग विमानातही बसले. नौदलप्रमुख आर. के. धवन यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
शनिवारी सकाळी वास्को येथील नौदलाच्या तळावर दाखल झालेल्या नरेंद्र मोदींनी 'आयएनएस विक्रमादित्य‘मधून प्रवास केला. तसेच नौदलाच्या सामर्थ्याचाही त्यांनी आढावा घेतला. पंतप्रधानांच्या भेटीनंतर ‘आयएनएस विक्रमादित्य‘ राष्ट्राला समर्पित करण्यात आली. ' आयएनएस विक्रमादित्य'चे वजन ४४,५०० टन इतके असून तब्बल १५ हजार कोटी रुपये खर्चून भारतीय नौदलाने ती रशियाकडून विकत घेत आपल्या क्षमतेत वाढ केली आहे.
‘तरंगते शहर‘ म्हटले जाणा-या या जहाजावर सागरी सुरक्षेसाठी वापरली जाणारी ‘मिग- २९के‘ ही लढाऊ विमाने तसेच हेलिकॉप्टरही ठेवली जाणार आहेत.
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी देशात एका राष्ट्रीय युद्ध स्मारकाची निर्मिती करण्याची घोषणा केली. तसेच सैन्य दला 'वन रँक वन पेन्शन' ही योजना लागू करणार असल्याचेही ते म्हणाले.