पणजी : राज्यात पेट्रोलचे दर येत्या १ जानेवारीपासूनच प्रती लिटर ५६ रुपये करण्याचा विचार आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी येथे ‘लोकमत’ला सांगितले. दिल्लीला निघण्यापूर्वी पार्सेकर यांनी पेट्रोलसंदर्भात भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, जेव्हा गोव्यासह देशभर पेट्रोलचे दर प्रति लिटर ७५-७६ रुपये होते, तेव्हा आमच्या सरकारने मूल्यवर्धीत कर ०.१ टक्के करून पेट्रोल सोळा रुपयांनी स्वस्त केले होते. त्या वेळी लोकांना पेट्रोलच्या मोठ्या दरवाढीची झळ बसू नये, असा हेतू होता. आता पेट्रोल दराबाबत तशी स्थिती नाही. आता पेट्रोल व डिझेलचे दर केंद्राकडून कमी केल्याने मूल्यवर्धीत करात थोडी वाढ करण्यास हरकत नाही. ते म्हणाले, पेट्रोलवरील मूल्यवर्धीत कर ५ टक्क्यांनी वाढविण्याचा विचार असल्याची घोषणा मी बुधवारी केली. त्याचे अनेकांनी स्वागत केले. वाहनधारक व माध्यमांनीही घोषणा सकारात्मकतेने घेतली. तुम्ही ५नव्हे, तर १५ ते २० टक्के व्हॅट वाढविला तरी हरकत नाही, असे सांगणारे अनेकजण आपल्याला भेटले. अगोदर एप्रिलपासून पेट्रोलवरील व्हॅट वाढवू पाहात होतो. तथापि, आता १ जानेवारीपासूनच व्हॅट वाढ लागू करावी, असे तत्त्वत: ठरविले आहे. यापूर्वी आॅगस्टमध्ये ३.५ टक्के व्हॅट लागू केला आहे. आता आणखी ३ टक्के किंवा ५ टक्के व्हॅट लागू केला जाईल. पेट्रोलची किंमत प्रति लिटर ५६ रुपयांपेक्षा जास्त होणार नाही एवढी काळजी घेईन. पेट्रोलचा दर हा डिझेलपेक्षा थोडा जास्त केला जाईल. (खास प्रतिनिधी)
पेट्रोल @ ५६ रुपये
By admin | Updated: December 26, 2014 02:10 IST