पणजी : भाजप २0१७ची विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वाखालीच लढणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी गुरुवारी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीसाठी तयारीच्या दृष्टिकोनातून पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांचे वेळापत्रकही तयार असून १0 जानेवारीपर्यंत दोन्ही जिल्हाध्यक्ष व १५ जानेवारीपर्यंत नवा प्रदेशाध्यक्ष निवडला जाईल, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेलेले मनोहर पर्रीकर यांचेच नेतृत्व येत्या विधानसभा निवडणुकीतही पुढे केले जाणार असल्याच्या चर्चेला प्रदेशाध्यक्षांच्या वरील स्पष्टोक्तीने पूर्णविराम मिळाला. भाजपने ३0 मतदारसंघांमध्ये बुथ समित्यांचे ४0 ते ४५ टक्के काम पूर्ण केले आहे. चालू महिन्याच्या अखेरपर्यंत १६00 पैकी १४00 बुथ समित्या स्थापन होतील. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पक्षाच्या मतदारसंघनिहाय निवडणुका सुरू होतील. ३0 मतदारसंघांमध्ये पक्षाचे अभ्यासवर्ग पूर्ण झालेले आहेत. ३७५0 कार्यकर्त्यांना प्रशिक्षित केले आहे. उर्वरित १0 मतदारसंघांमध्ये चालू महिनाअखेरपर्यंत अभ्यासवर्ग घेतले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार महासंपर्क अभियानाचा तिसरा टप्पा पूर्ण झालेला आहे. (प्रतिनिधी)
निवडणुकीचे नेते पार्सेकरच!
By admin | Updated: December 4, 2015 01:24 IST