पणजी : ग्रामपंचायतींना पायाभूत सुविधांसाठी दीनदयाळ पंचायत राज इन्फ्रास्ट्रक्चर योजनेअंतर्गत दिला जाणारा निधी एक कोटी रुपयांवरून दोन कोटींपर्यंत वाढविल्याची घोषणा पंचायात मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभेत केली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत ३१ प्रकल्प मंजूर झाले आहेत. १९ प्रकल्पांच्या बाबतीत अर्ज विचाराधीन आहेत. ग्रामपंचायतींना जागा, स्वत:ची इमारत, शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी हा निधी दिला जातो. पंचायती आपल्या पायावर उभ्या राहाव्यात आणि स्वावलंबी बनाव्यात हा या योजनेमागचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेत विरोधी, तसेच सत्ताधारी आमदारांनी निधीची रक्कम वाढवावी, अशी मागणी केली होती. काही ग्रामपंचायतींमध्ये सचिवांकडे दोन-दोन ठिकाणचा कार्यभार आहे. त्यामुळे लोकांची कामे अडतात, याकडेही लक्ष वेधण्यात आले. पार्सेकर यांनी त्यावर असे स्पष्ट केले, की सचिवांची ४२ रिक्त पदे लवकरच भरली जातील, तसेच जेथे अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे तेथे हंगामी व्यवस्था म्हणून ग्रामसेवकांची नियुक्ती करून सचिवांचे काम त्यांच्याकडे सोपविले जाईल. अनेक आमदारांनी पंचायत क्षेत्रातील बेकायदा बांधकामे तसेच जिल्हा पंचायतींनी विकासकामांसाठी मिळणारा अत्यल्प निधी याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. (प्रतिनिधी)
पंचायतींना आता दोन कोटी
By admin | Updated: August 12, 2014 01:33 IST