पणजी : राज्यात ग्रामपंचायतींच्या आणि जिल्हा पंचायतींच्या निवडणुका पक्षाच्या बॅनरखाली घेण्याचा प्रस्ताव सरकारसमोर आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत मंगळवारी सादर केलेल्या एका लेखी उत्तरातून स्पष्ट होत आहे. २०१५ साली जिल्हा पंचायतीच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत काय, आणि त्या पक्षाच्या बॅनरखाली घ्याव्यात असे ठरले आहे काय, अशी विचारणा सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांनी केली होती. त्यास मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिले आहे. गोवा पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणूक प्रक्रियेच्या १९९६ सालच्या नियमांनुसार पंचायत किंवा जिल्हा पंचायत निवडणुका घेणे हे राज्य सरकार राज्य निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून ठरवते, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. ग्रामपंचायत व पालिका निवडणुकाही पक्षाच्या बॅनरखाली घ्याव्यात असे ठरले आहे काय, अशीही विचारणा आमदार गावकर यांनी केली आहे. त्यावर पालिका निवडणुका पक्षाच्या बॅनरखाली घेण्याचा अजून तरी प्रस्ताव नाही, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हा पंचायत व ग्रामपंचायत निवडणुका मात्र पक्षाच्या बॅनरखाली घेण्याचा धोरणात्मक निर्णय सरकार घेणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. (खास प्रतिनिधी)
पंचायत, जिल्हा पंचायत निवडणुका पक्ष स्तरावर
By admin | Updated: August 20, 2014 02:35 IST