पणजी : राजधानी पणजीत वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे लोक हैराण झाले आहेत. सायंकाळी सहा वाजल्यानंतर तर अघोषित लोड शेडिंग सुरू होते. उच्च दाबाच्या वाहिनीवरून जो वीजपुरवठा केला जातो, तो बंद करून सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत पणजीच्या काही भागांत अघोषित लोड शेडिंग केले जाते. शनिवारी सकाळपासून दुपारपर्यंत सांतइनेजच्या भागात वीजपुरवठा खंडित होता. पणजीतील अन्य एक-दोन भागांमध्ये तर सायंकाळीही वीजपुरवठा व्यवस्थित सुरू नव्हता. गेले तीन दिवस विजेचा लपंडाव सुरू आहे व याचा फटका व्यवसायाला बसल्याचे काही व्यावसायिकांनी ‘लोकमत’ला सांगितले. पणजीत अनेक व्यावसायिक आस्थापने, दुकाने व अन्य लहान-मोठे व्यवसाय चालतात. दोन-तीन तास वीजपुरवठा खंडित झाला तरी व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होते. कधी थिवी येथे, तर कधी रायबंदर बायपासच्या ठिकाणी वीजवाहिन्या किंवा अन्य वीज यंत्रणा खराब होते. परिणामी, पणजी व ताळगाव मतदारसंघातील लोकांना अंधारात रात्र काढावी लागते. फोंड्याहून येणाऱ्या वीजवाहिनीत बिघाड झाला व त्यामुळे पणजीच्या पुरवठ्यास शनिवारी सकाळपासून दुपारपर्यंत फटका बसल्याचे वीज खात्याच्या एका अभियंत्याने सांगितले. सायंकाळी वीजपुरवठा पूर्ववत झाल्याचा दावा या अभियंत्याने केला. सायंकाळी लोड शेडिंगचा अनुभव पणजीत येत असल्याचे त्यांनी मान्य केले. (खास प्रतिनिधी)
पणजीत अघोषित लोड शेडिंगचा शॉक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2015 01:58 IST