पणजी : कस्तुरीरंगन अहवालात गोव्यात पश्चिम घाटातील जे ९९ गाव पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील ठरविले आहेत, त्यातील १४ गाव अस्तित्वातच नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या अहवालावर किती विश्वास ठेवावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या अहवालातील माहिती अवास्तव असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. दुसरीकडे सरकार, उद्योजक यांचा या अहवालातील शिफारशींना विरोध आहे. केंद्राने याच अहवालाच्या आधारे अधिसूचना जारी केल्याने पश्चिम घाटात एकही खाण चालू शकणार नाही. सरकारच्या मते कोणतीही विकासकामे या भागात होऊ शकणार नाहीत. या अहवालात पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील नमूद करण्यात आलेली नावे तपासली असता, सत्तरी तालुक्यातच किमान आठ आणि सांगे तालुक्यात सहा गावांची नावे अशी आढळून आली आहेत की प्रत्यक्षात हे गाव अस्तित्वातच नाहीत. सत्तरीत डोंगरवाडी, गोंयकारवाडा, भायलावाडा, हसोळे, चरवडा, रायवर, पेन्रल, गोवनोनाणे आदी गाव दर्शविण्यात आले आहेत; परंतु प्रत्यक्षात अशा नावांचे गावच अस्तित्वात नाहीत. सांगे तालुक्यात आलोट, रुंबारेम, नाकुने, डोंगर्ली, डोंगर, शिंगोणे गाव अस्तित्वात नाहीत. त्यामुळे कस्तुरीरंगन समितीला ही नावे कुठून मिळाली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाळपई शहर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील दाखवण्यात आले आहे. सांगे, काणकोण व सत्तरी हे तीन तालुके पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील विभागात मोडणारे आहेत; परंतु धारबांदोडा तालुक्यातही अशी नऊ गावे दाखवण्यात आली आहेत, जी पर्यावरणीय संवेदनशील आहेत.
अस्तित्वात नसलेले गाव पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील
By admin | Updated: June 2, 2014 01:47 IST