पणजी : गोव्यात नोंद झालेल्या गोमंतकीयांच्या वाहनांनाही प्रवेश शुल्क लागू करण्याचा प्रस्ताव असला, तरी प्रत्यक्षात अंतिम निर्णय घेताना गोव्याच्या वाहनांना या शुल्कातून वगळले जाणार आहे. बांधकाम खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडून ही माहिती मिळाली. सार्वजनिक बांधकाम खात्याने गोव्यातील वाहनांनाही परप्रांतात गेल्यानंतर पुन्हा गोव्यात प्रवेश करताना शुल्क लागू करावे, असे तत्त्वत: ठरवून त्याबाबतची मसुदा अधिसूचनाही जारी केली. याविषयी लोकांत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या प्रतिनिधीने मंगळवारी मंत्री ढवळीकर यांना विचारले असता ते म्हणाले की, गोव्यात नोंद झालेल्या वाहनांना प्रवेश शुल्क लागू करू नये, असे मलाही वाटते. आम्हाला मुळात गोव्याच्या जवळ जे जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांमधील वाहनांना प्रवेश शुल्क लागू करायचे आहे. बेळगाव, सिंधुदुर्ग व गोव्याला टेकून असलेल्या अन्य भागांतील वाहनांना आम्ही प्रवेश शुल्क लागू केले नव्हते. तथापि, यापुढे ते लागू केले जाईल. गोमंतकीय वाहनांना प्रवेश शुल्क लागू करावे की नाही, याविषयी लोकांनी मतप्रदर्शन करावे, या हेतूने आम्ही मसुदा अधिसूचना जारी केली आहे; पण प्रत्यक्षात गोमंतकीय वाहनांना शुल्कातून वगळले जाईल. तसा बदल आम्ही अंतिम अधिसूचनेत करू. चोर्ला घाटातून गोवा-बेळगाव रस्त्याचे आता हॉटमिक्सिंग केले जात आहे. त्या रस्त्याच्या बाजूने असलेले गटार उपसले जातील. त्या रस्त्याच्या बाजूने आम्हाला भू-संपादन करता येत नाही; कारण केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाची प्रत्येकबाबतीत मान्यता घ्यावी लागते. केंद्राचा नवा भू-संपादन कायदा अजून स्पष्ट झालेला नाही. आम्हाला सध्या जो रस्ता अस्तित्वात आहे, त्यातच सुधारणा करायची आहे व त्यासाठी हॉटमिक्सिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. या रस्त्यावर जिथे वळणे आहेत, तिथे दिशादर्शक फलक लावले जातील, असे ढवळीकर म्हणाले. (खास प्रतिनिधी)
गोव्याच्या वाहनांना प्रवेश शुल्क नाही!
By admin | Updated: May 14, 2014 00:46 IST