पणजी : महापालिकेची सर्वसाधारण बैठक सोमवारी (दि.१९) होत आहे. या बैठकीत बायंगिणी कचरा प्रकल्पासाठीची १ लाख १७ हजार चौरस मीटर जमीन औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याच्या मुद्द्यावर गदारोळ होण्याची शक्यता आहे. कचरा प्रकल्पाची जागा औद्योगिक विभाग म्हणून अधिसूचित करण्यासाठी ही जमीन आधी आयडीसीकडे सूपूर्द करावी लागणार आहे. विरोधकांनी या प्रश्नावरून महापौरांना धारेवर धरण्यासाठी मोर्चेबांधणी केलेली आहे. या वेळी मनपाच्या रोजंदारीवरील कामगारांच्या वेतनाचा प्रश्नही चर्चेला येणार आहे. काही विकासकामे या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहेत. बायंगिणी येथे सर्व्हे क्रमांक २0/१ (भाग), सर्व्हे क्रमांक २0/२ (भाग), सर्व्हे क्रमांक २0/३ अ (भाग) ही जमीन कचरा प्रकल्पासाठी मनपाने लिजवर घेतलेली आहे. ही जमीन आयडीसीकडे हस्तांतरित केली जाणार आहे. मनपा कामगारांच्या वेतनाच्या पुनर्रचनेवर बैठकीत चर्चा होणार आहे. काही महिन्यांपूर्वी कामगारांनी वेतनाच्या प्रश्नावर संप केल्यानंतर वाटाघाटी झाल्या व त्या पार्श्वभूमीवर आयुक्त संजित रॉड्रिग्स यांनी २३ जून २0१५ रोजी परिपत्रक काढले आहे, त्याविषयी अंमलबजावणी तसेच रोजंदारीवरील कामगारांना सेवावाढ देणे या विषयांवर चर्चा विनिमय होणार आहे. शहरात ‘पे पार्किंग’च्या बाबतीत नव्याने काढलेल्या निविदा स्वीकारण्याच्या विषयावरही चर्चा केली जाईल. सरकारी अनुदानातून हाती घ्यावयाच्या विकासकामांवरही चर्चा होणार आहे. (प्रतिनिधी)
मनपा बैठकीत गदारोळ शक्य
By admin | Updated: October 19, 2015 02:31 IST