पणजी : मंगळुर येथे पबवर हल्ला केल्यानंतर वादग्रस्त बनलेले श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली (रासुका) गोवा पोलिसांनी ताब्यात घ्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी पत्रकारांना सांगितले. मुतालिक यांच्यापासून राष्ट्राला धोका आहे. तालिबानला घाबरून पर्यटक ज्याप्रमाणे पाकिस्तान व अफगाणिस्तानला जात नाहीत, त्याचप्रमाणे मुतालिक यांना जर गोव्यात कारवाया करू दिल्या तर गोव्यातही पर्यटक येणे बंद होईल, असे फर्नांडिस यांनी नमूद केले. सरकार जर मुतालिक यांना गोव्यात प्रवेश करण्यावर बंदी लागू करत नसेल तर मुतालिक यांना रोखण्यासाठी लोकांना घेऊन आम्ही थेट रस्त्यावर उतरू, असाही इशारा त्यांनी दिला. ‘मोरल पोलिसिंग’च्या नावाखाली गोव्यात कोणी कायदा व सुव्यवस्था बिघडवू नये, असे ते म्हणाले. मुतालिक यांनी यापूर्वी केलेल्या प्रक्षोभक विधानांची दखल घेऊन त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्याचा आदेश पोलिसांना दिला जावा म्हणून काँग्रेसचे प्रवक्ते दुर्गादास कामत यांनी न्यायालयास याचिका सादर केली आहे.
मुतालिकांना रासुका लावा : जॉन
By admin | Updated: June 29, 2014 02:02 IST