पणजी : मुंबईच्या सीएसटी स्टेशनवरून येत्या सोमवारी (दि. २९) रात्री दहा वाजता साडेसातशे पर्यटक प्रवाशांना घेऊन खास पर्यटन रेल्वे गोव्याच्या दिशेने निघणार आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी शनिवारी येथे ‘लोकमत’ला दिली. मध्यमवर्गीय पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने खास पर्यटन रेल्वे गोव्यात आणण्यासाठी नुकताच पर्यटन खाते, पर्यटन विकास महामंडळ व रेल्वे मंत्रालय यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला आहे. पहिल्या टप्प्यात आठवड्यातून तीन वेळा मुंबईहून गोव्याकडे पर्यटन रेल्वे येईल. पर्यटकांचा प्रतिसाद पाहून मग फेऱ्या वाढविता येतील, असे मंत्री परुळेकर म्हणाले. सोमवारी मुंबईहून सुटणारी रेल्वे मंगळवारी सकाळी साडेपाच वाजता गोव्यात दाखल होईल. तिथे आपण व पर्यटन खात्याचे संचालक मिळून पर्यटक प्रवाशांचे स्वागत करणार आहोत. भविष्यात रेल्वेद्वारे येणाऱ्या पर्यटकांसाठी गोव्यात निश्चित स्वरूपाचे असे एखादे पॅकेज तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. रेल्वेचे तिकीट, हॉटेलचे भाडे, टॅक्सी सेवा वगैरे खर्च त्या पॅकेजमध्ये येतील. सध्या पर्यटन मोसमात राज्यातील सगळ्या हॉटेलचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे पॅकेज निश्चित केले गेलेले नाही. पुढील काळात ते निश्चित होईल, असे परुळेकर यांनी नमूद केले. दरम्यान, पर्यटन रेल्वेत गोव्याचे कोकम सरबत पुरविण्याची व्यवस्था व्हावी, तसेच हस्तकारागिरांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री गोव्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर करण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, अशी विनंती मंत्री परुळेकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना नुकतीच केली होती. त्या विनंतीची दखल घेऊन प्राथमिक स्वरूपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)
मुंबई-गोवा पहिली पर्यटनरेल्वे उद्यापासून
By admin | Updated: December 28, 2014 09:38 IST