पणजी : नुवे मतदारसंघाचे आमदार मिकी पाशेको यांना लवकरच मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार आहे व त्यासाठी एका भाजप मंत्र्यास मंत्रिमंडळातून डच्चू दिला जाण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसचे आमदार माविन गुदिन्हो यांना मात्र भाजपात स्थान मिळणे अशक्य आहे. पाशेको यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी भाजपच्या नेमक्या कुठल्या मंत्र्याला डच्चू दिला जाईल ते स्पष्ट झालेले नाही; पण दोघा-तिघा मंत्र्यांची नावे पुढे येत आहेत. आपल्याला लवकरच मंत्रिपद मिळेल, असे पाशेको यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीवेळी नुवेचे आमदार पाशेको यांनी भाजपला प्रचार कामात मदत केली असल्याने त्यांना मंत्रिपद द्यावे, असे ठरले आहे. मुख्यमंत्र्यांनी सूचना केली, तर भाजपचा एक मंत्री मंत्रिपद सोडण्यास तयार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोवा विकास पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले पाशेको हे मंत्रिपद मिळविण्यासाठी आग्रही होते. १६ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांची ही मागणी मान्य करण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरविले आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाची फेररचना केली जाणार आहे. दरम्यान, काँग्रेसचे आमदार गुदिन्हो हे आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये येण्यास तयार आहेत. त्यांनाही मंत्रिपद हवे आहे; पण त्यांना ते दिले जाणार नाही, अशी माहिती भाजपमधून मिळाली.
मिकी पाशेकोंना मंत्रिपद
By admin | Updated: May 11, 2014 00:53 IST