पणजी : राज्यातील खनिज लिजांचे नूतनीकरण करून मिळावे म्हणून ज्या कंपन्यांनी स्टॅम्प ड्युटी भरली आहे, त्या सर्व २८ कंपन्यांना आता गोवा फाउंडेशनकडून प्रतिवादी केले जाणार आहे. त्यासाठी दुरुस्ती याचिका गोवा फाउंडेशन दोन आठवड्यांत सादर करणार असून येत्या १३ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात खाणप्रश्नी पुढील सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने स्टॅम्प ड्युटी भरलेल्या कंपन्यांना खनिज लिजांचे नूतनीकरण करून दिले जावे, असा निवाडा गेल्या १३ आॅगस्ट रोजी दिल्याने गोवा फाउंडेशनने या निवाड्यास आव्हान दिले आहे. फाउंडेशनची विशेष याचिका सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस आली. आपल्याला या याचिकेत प्रतिवादी केले गेलेले नाही, असा आक्षेप या वेळी काही खाण कंपन्यांच्या वकिलांनी नोंदवला. एकूण अठ्ठावीस खाण कंपन्यांशी हायकोर्टाच्या निवाड्याचा व फाउंडेशनच्या याचिकेचा संबंध आहे; पण सेसा स्टरलाईट या एकमेव कंपनीस प्रतिवादी करण्यात आले असल्याचा मुद्दा मेसर्स कॉस्मे कॉस्टा अॅण्ड सन्स कंपनीचे प्रतिनिधित्व करणारे वकील ए. एम. सिंघवी यांनी मांडला. त्यावर फाउंडेशन सुधारित याचिका सादर करील, असे गोवा फाउंडेशनचे वकील प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या वनविषयक खंडपीठास सांगितले. स्टॅम्प ड्युटी भरलेल्या सर्व २८ कंपन्यांना प्रतिवादी करण्यास भूषण यांनी परवानगी मागितली व न्यायालयाने ती दिली. येत्या १३ रोजी न्यायालयासमोर गोवा फाउंडेशनची याचिका दुरुस्तीसह येईल, तेव्हा भूषण युक्तिवाद करतील. (खास प्रतिनिधी)
खनिज लिजांचे दावेदार प्रतिवादी
By admin | Updated: September 23, 2014 02:22 IST